ठळक मुद्देवेस्टइंडीज संघाचा याआधी सामना पुण्यातील क्रिडा-रसिकांसाठी ऐतिहासिक पर्वणी ठरला होता.
पुणे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील स्टेडियमवर भारत-वेस्टइंडीज यांच्यात येत्या २७ तारखेला एकदिवसीय सामन्याचा थरार पुणेकरांना अनुभवता येणार आहे.
सुमारे एका वर्षानंतर एमसीएच्या स्टेडियमवर होणारा हा चौथा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना असून याआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरूद्ध भारत खेळला आहे. एकदिवसीय सामना रंगले होते. बरोबर १ वर्ष आणि २ दिवसांनी एमसीएचे स्डेडियम पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे.
वेस्टइंडीज संघाचा याआधी सामना पुण्यातील क्रिडा-रसिकांसाठी ऐतिहासिक पर्वणी ठरला होता. १९९६ वर्ल्ड कप स्पधेर्तील केनियाविरूद्धच्या सामन्यात वेस्डइंडीजला पराभवाचा सामना करावा लागला होता. पुण्यातील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला होता. मागील वर्षी २३ फेब्रुवारीला एमसीएच्या स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. हा पुण्यातील पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता आणि त्यामुळे तो ऐतिहासिक ठरला होता. भारत आणि वेस्डइंडीज या उभय देशांमधील सामने भारतात इतर शहरांमध्ये झाले आहेत. या संघांमध्ये पुण्यात होणारा हा पहिलाच सामना ठरणार आहे.
एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर याआधी झालेल्या तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाने संमिश्र कामगिरी केली आहे. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारत पराभूत झाला. त्यानंतर १५ जानेवारी २०१७ रोजी इंग्लंडविरूद्ध भारतीय संघाने सनसनाटी विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि स्थानिक खेळाडू केदार जाधव यांनी धडाकेबाज शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. मागील वर्षीच २५ आॅक्टोबरला झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडविरूद्ध ६ गडी राखून सहज विजय मिळविला होता. न्यूझीलंडने ९ गडी गमावून २३० धावा केल्यानंतर ४ बाद २३२ धावा फटकावत भारताने हा सामना जिंकला.
भारत दौऱ्यावर असलेला विंडीज संघ पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार असून हे सामने गुवाहाटी, विशाखापट्टणम, पुणे, मुंबई आणि थिरूअनंतपुरम येथे होणार आहेत. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली पाहुणा संघ ३ टी-२० सामनेही खेळणार आहे. कोलकता, लखनौ आणि चैन्नई येथे या लढती होतील.
तिकीटविक्री सुरू
भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील आगामी एकदिवसीय सामन्याच्या अधिकृत तिकीट विक्रीला शनिवारपासून (दि. १३) प्रारंभ झाला. क्रिकेटप्रेमींना दोनप्रकारे तिकीट विकत घेता येतील.