India vs West Indies, 3rd T20I : भारताच्या ५ बाद १८४ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ९ बाद १६७ धावा करता आल्या आणि भारताने १७ धावांनी हा सामना जिंकला. वन डे मालिकेपाठोपाठ रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-२० मालिकेतही ३-० असे निर्भेळ यश मिळवले.
श्रेयस अय्यर ( २५) व इशान किशन ( ३४) यांनी टीम इंडियाची गाडी रुळावर आणल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर या जोडीने चांगली फटकेबाजी केली. अय्यर १९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला, तर अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. त्याने ३१ चेंडूंत १ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावा कुटल्या आणि भारताने ५ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली.
सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व वेंकटेश अय्यर ( Venktesh Iyer) यांच्या ९१ धावांच्या भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला. हर्षल पटेलने ४ षटकांत २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. दीपक चहर ( २-१५), वेंकटेश अय्यर ( २-२३) व शार्दूल ठाकूर ( २-३३) यांनीही कमाल गोलंदाजी केली. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरन ४७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकार खेचून ६१ धावा आणि रोवमन शेफर्ड २९ धावा करताना संघर्ष केला.
या विजयानंतर
रोहित शर्माने जेतेपदाची ट्रॉफी युवा खेळाडूंकडे सोपवण्याची परंपरा कायम राखली. वन डे मालिकेत रोहितने फिरकीपटू रवी बिश्नोईला हा मान दिला होता, तर ट्वेंटी-२० मालिकेत पदार्पणवीर
आवेश खानच्या हाती ट्रॉफी सोपवून रोहित कोपऱ्यात जाऊन उभा राहिला..