वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १४० धावांनी दणदणीत विजय मिळवला. अवघ्या तीन दिवसांत हा सामना जिंकून भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयात स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने नाबाद १०४ धावा केल्या, तसेच चार विकेट्स घेऊन अष्टपैलू कामगिरीचा ठसा उमटवला. या मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना येत्या १० तारखेपासून दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर सुरू होणार आहे. या सामन्यात जाडेजाकडे एक मोठा आणि ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
जर जाडेजाने या सामन्यात फक्त १० धावा केल्या, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये ४००० धावा आणि ३०० विकेट्स घेणारा दुसरा भारतीय आणि जगातील चौथा खेळाडू बनेल. आतापर्यंत हा दुर्मिळ विक्रम केवळ कपिल देव (भारत), इयान बॉथम (इग्लंड) आणि डॅनियल व्हेटोरी (न्यूझीलंड) या तीन दिग्गज क्रिकेटपटूंनीच केला आहे.
पहिल्या सामन्यात मोठा पराक्रम
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यामुळे रवींद्र जाडेजा अशा निवडक क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांनी ३०० हून अधिक कसोटी विकेट्स घेतल्या आहेत आणि सहा किंवा त्याहून अधिक शतके झळकावली आहेत. या खास क्लबमध्ये जाडेजासोबत इयान बोथम (इंग्लंड), कपिल देव (भारत), रवी अश्विन (भारत), इम्रान खान (पाकिस्तान) आणि डॅनियल व्हेटोरी (न्यूझीलंड) यांचा समावेश आहे.
जाडेजाडी कसोटी कारकिर्द
सध्या जाडेजाच्या नावावर ८६ कसोटी सामन्यांमध्ये ३ हजार ९९० धावा आणि ३३४ विकेट्स आहेत. दिल्ली कसोटीत ४००० धावांचा टप्पा पूर्ण करताच रवींद्र जाडेजा जगातील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जाईल. क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता १० तारखेपासून सुरू होणाऱ्या या सामन्याकडे लागले आहे.