India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पोर्ट ऑफ स्पेनमधील दुसऱ्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया जाणार असल्याची चिन्हे आहेत. वेस्ट इंडिजला विजयासाठी पाचव्या दिवशी ९८ षटकांत २८९ धावा करायच्या आहेत, तर भारताला ८ विकेट्स हव्या आहेत. पण, पावसामुळी ही मॅच अडीच तास झाले तरी अद्याप सुरू झालेली नाही. दोन तास धो धो पडल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे आणि खेळपट्टीवरील कव्हर्स काढले गेले आहेत. लख्ख सूर्य प्रकाशही पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दिसतोय आणि त्यामुळे लवकरच मॅच सुरू होईल अशी अपेक्षा आहे. पण, भारतीय खेळाडू अद्याप स्टेडियमवर पोहोचले नसल्याची बातमी समोर येतेय.
भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३६५ धावांचा पाठलाग करताना आर अश्विनने चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजला धक्के बसले आहेत. क्रेग ब्रेथवेट व तेजनारायण चंद्रपॉल यांनी सावध सुरुवात केली. आर अश्विनने प्लान आखून ब्रेथवेटला ( २८) स्वीप मारण्यास भाग पाडले अन् जयदेवने सोपा झेल टिपला. अश्विनने पुढच्याच षटकात किर्क मॅकेंझीला ( ०) पायचीत केले. चौथ्या दिवसअखेर विंडीजने २ बाद ७६ धावा केल्या होत्या. पावसामुळे भारतीय खेळाडूंनी हॉटेलमध्येच थांबणे पसंत केले आहे. आता पाऊस थांबला आहे आणि लंच ब्रेक घेतला गेला आहे. त्यामुळे आता भारताला ही कसोटी जिंकण्यासाठी दोन सत्रांमध्ये ८ विकेट्स घ्यावा लागणार आहेत.
तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावातील १८३ धावांच्या आघाडीत दुसऱ्या डावात १८१ धावांची भर घालून वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३६५ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताच्या ४३८ धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजचा संपूर्ण संघ २५५ धावांत माघारी परतला. मोहम्मद सिराजने ६० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. रोहित शर्मा ( ५७) व यशस्वी जैस्वाल ( ३८) यांनी दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी करताना ९८ धावांची सलामी दिली. इशानने चौथ्या क्रमांकावर येताना ३४ चेंडूंत नाबाद ५२ धावा केल्या. शुबमन गिल २९ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने २ बाद १८१ धावांवर दुसरा डाव घोषित केला.