Kuldeep Yadav Scripts History Breaks World Record : भारतीय संघातील डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव संधी मिळाली की, सोनं करतोच. इंग्लंड दौरा बाकावर बसून काढल्यावर वेस्ट इंडिज विरुद्धच्या घरच्या मैदानातील कसोटी मालिकेत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या फिरकीची जादू दाखवून दिली. पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत धाडत त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुलदीप यादवनं साधला मोठा डाव; थेट विश्वविक्रमाला गवसणी
कुलदीप यादवनं वेस्ट इंडिज विरुद्ध ५ विकेट्सचा डाव साधला. कसोटी कारकिर्दीत पाचव्यांदा त्याने हा पराक्रम करून दाखवलाय. एवढेच नाही तर सर्वात कमी डावात ५ वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा मोठा पराक्रम त्याने करून दाखवला आहे. क्रिकेट जगतात कोणत्याही डावखुऱ्या फिरकीपटूनं केलेली ही सर्वात जलद कामगिरी ठरली. कुलदीप यादवनं इंग्लंडचा दिग्गज जॉनी वॉर्डल यांना मागे टाकले आहेत. या दिग्गजानं ५ वेळा 'पंजा' मारण्यासाठी २८ सामने खेळले होते. कुलदीप यादवनं फक्त १५ व्या सामन्यात पाचव्यांदा 'पंजा' मारत नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे.
IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन
कसोटीत सर्वाधिक पाच विकेट हॉलचा रेकॉर्ड (डावखुऱ्या हाताचे फिरकीपटू)
- ५ – कुलदीप यादव (१५ सामन्यांत)
- ५ – जॉनी वॉर्डल (२८ सामन्यांत)
- ४ – पॉल ॲडम्स (४५ सामन्यांत)
भारतीय संघानं ५१८ धावांवर डाव घोषित केल्यावर फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्या दिवसाअखेर १४० धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. दुसऱ्या दिवशी एकमेव विकेट आपल्या खात्यात जमा करणाऱ्या कुलदीप यादवनं तिसऱ्या दिवसाच्या खेळात ४ विकेट्स घेत कॅरेबियन संघाला नाचवले. ८२ धावा खर्च करून त्याने ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या फिरकीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धांवर आटोपला.
कुलदीप यादवची कसोटीतील कामगिरी
कुलदीप यादवनं २०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आर अश्वि नआणि जडेजामुळे त्याला घरच्या मैदानातील सामन्यातही फारशी संधी मिळाली नाही. पण आर. अश्विनच्या निवृत्तीनंतर तो टीम इंडियीतल प्रमुख फिरकीपटूच्या रुपात छाप सोडताना दिसतोय. आतापर्यंत १५ सामन्यातील २८ डावात त्याने कसोटीत ६५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. ४० धावांत ५ विकेट्स ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.