IND vs WI 2nd Test, Day 2 Yashasvi Jaiswal Got Run Out For 175 : भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल दिल्ली कसोटीतील दुसऱ्या दिवसाच्या खेळात सहज द्विशतकाला गवणी घालेल, असे वाटत होते. पण दुसऱ्या दिवसाच्या खेळात १७३ धावांवरून फलंदाजीला सुरुवात करणारा यशस्वी अवघ्या २ धावांची भर घालून तंबूत परतला. विशेष म्हणजे त्याने धावबादच्या रुपात आपली विकेट गमावली. पहिल्या डावात जैस्वालनं २५८ चेंडूत १७५ धावांची खेळी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चेंडू हातात मारून धाव काढण्याचा डाव यशस्वी जैस्वालच्या अंगलट आला
क्रिकेटच्या मैदानात दोन्ही फलंदाजांतील ताळमेळाच्या अभावामुळे धावबाद झाला की, चूक कोणाची हा प्रश्न नेहमीच चर्चेत येतो. त्यामुळे यशस्वीला द्विशतकाच्या जवळ धावबाद करण्यात कर्णधार शुबमन गिल जबाबदार होता का? असा प्रश्न पडू शकतो. पण इथं यशस्वी जैस्वालनंच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. फटका मारल्यावर चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात जात असताना त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यात पंचांनीही चूक केली, असे पुन्हा पुन्हा रिप्ले पाहिल्यावर लक्षात आले.
यशस्वी चुकला, पण मैदानातील पंचही द्विशतक हुकण्यात कारणीभूत ठरला
जिथं धाव होत नाही तिथं धाव घेण्याचा केलेला प्रयत्न यशस्वीच्या अंगलट आला. पण मोठी चूक करूनही त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली असती. कारण धावबादसाठी चंद्रपॉल याने केलेल्या अचूक थ्रोवर कॅरेबियन यष्टीरक्षक गडबडला होता. यशस्वी जैस्वाल क्रीजपासून खूप लांब होता. पण टेविन इमलॅच (Tevin Imlach) याने यशस्वीला धावबाद करताना बेल्स उडवल्या त्यावेळी चेंडू त्याच्या हातात असल्याचे दिसत नव्हते. याचा अर्थ जर मैदानातील पंचांनी हा निर्णय देण्याआधी तिसऱ्या पंचांची मदत घेतली असती तर निश्चितच यशस्वी नाबाद ठरला असता. भारताचा युवा सलामीवीर धावबादच्या रुपात जाळ्यात अडकल्यावर कॅरेबियन ताफ्यातही फार उत्साह दिसला नाही. किमान ही गोष्ट लक्षात घेऊन जरी मैदानातील पंच तिसऱ्या अंपायरकडे वळले असते तर भारतीय संघाससह यशस्वीच्या बाजूनं कौल लागला असता. त्यामुळेच यशस्वी चुकालाच, पण तो खरा फसला ते पंचामुळेच असे म्हणावे लागेल.