भारतीय संघानं दिल्लीच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाहुण्या कॅरेबियन संघाची अवस्था बिकट केली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळात यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकल्यावर कर्णधार शुबमन गिलच्या भात्यातून शतकी खेळी पाहायला मिळाली. पाचवी विकेट गमावल्यावर नाबाद १२९ धावांवर खेळत असताना गिलनं ५ बाद ५१८ धावांवर पहिला डाव घोषित केला. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्या दिवसाअखेर १४० धावांत ४ विकेट्स गमावल्या. वेस्ट इंडिजचा संघ अजूनही ३७८ धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या सामन्यातही पाहुण्या संघाला धावांनी नव्हे तर डावांनी पराभूत करण्याचा परफेक्ट प्लॅन शिजला आहे. टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार की, वेस्ट इंडिज संघ चमत्कार दाखवून सामना चौथ्या दिवसांपर्यंत घेऊन जाणार का? ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाकडून पहिल्या डावात दोन शतकवीर! साईनं शतकाची तर यशस्वीनं द्विशतकी संधी गमावली
दिल्ली कसोटीतील दुसऱ्या दिवसाच्या खेळात यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल जोडीनं २ बाद ३१८ धावांवरुन दुसऱ्या दिवसातील खेळाला सुरुवात केली. अवघ्या २ धावांची भर घालून यशस्वी जैस्वाल धावबाद होऊन तंबूत परतला. त्यानं २५८ चेंडूत २२ चौकाराच्या मदतीने १७५ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. जैस्वालची विकेट गमावल्यावर टीम इंडियाकडून एक नवा प्रयोग पाहायला मिळाला. नितीश कुमार रेड्डीला बढती मिळाली अन् तो पाचव्या फलंदाजीला आला. त्याने ५४ चेंडूत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. ध्रुव जुरेलनं ७९ चेंडूत ४४ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाच्या पहिल्या डावात लोकेश राहुलनं ५४ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३८ धावा तर साई सुदर्शन याने १६५ चेंडूत १२ चौकाराच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. कॅरेबियन संघाकडून वॉरिकन याने सर्वाधिक ३ तर कर्णधार रॉस्टन चेस याने एक विकेट घेतली.
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
टीम इंडियाकडून गोलंदाजीत जड्डूचा जलवा!
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने चांगली सुरुवात केली. पण संघाच्या धावफलकावर २१ धावा असताना जॉन कॅम्पबेलच्या रुपात रवींद्र जडेजाने त्यांना पहिला धक्का दिला. टॅगेनरीन चंद्रपॉल आणि अलिक अथनाझे या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. सेट झालेली ही जोडीही जड्डूनेच फोडली. चंद्रपॉल ६७ चेंडूत ३४ धावा करून माघारी फिरला. कुलदीप यादवनं अलिक अथनाझे याला आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने ८४ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. जड्डूनं वेस्ट इंडिजचा कर्णधार रॉस्टन चेज याला खातेही उघडू दिले नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी शाय होप ४६ चेंडूत ३१ तर तेविन इमालॅच ३१ चेंडूत १४ धावांवर खेळत होता. अहमदाबादच्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा खेळ तिसऱ्या दिवशीच खल्लास झाला होता. आता दिल्ली कसोटीत पुन्हा टीम इंडियाला तोच डाव साधायचा असेल तर १६ विकेट्स घ्याव्या लागतील. दुसरीकडे पुन्हा तीच नामुष्की न ओढावणार नाही, यासाठी पाहुणा संघ प्रयत्नशील दिसेल.