India vs West Indies 1st T20I Live Marathi : वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला आरसा दाखवला. १५० धावांचे लक्ष्य भारतीय संघासाठी अवघड नव्हते, परंतु विंडीजच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. इशान किशन व शुबमन गिल यांच्या अपयशानंतर भारताने सामन्यात पुनरागमन केले होते. पण, सेट फलंदाज झटपट बाद झाले. संजू सॅमसनचा रन आऊट विंडीजसाठी निर्णायक क्षण ठरला. जेसन होल्डरने ( १-१९) टाकलेल्या १६व्या षटकात सामना फिरला होता. स्लो ओव्हर रेटमुळे विंडीजला अखेरच्या दोन षटकांत ४ खेळाडू सर्कलबाहेर उभे करावे लागले आणि याचा फायदा अर्शदीप सिंगने उचलला, परंतु भारताचा पराभव तो नाही टाळू शकला.
०,६,६,०,४! तिलक वर्माची पदार्पणात दमदार सुरूवात, परंतु भारताची लागलीय वाट, Video
ब्रेंडन किंगने ( २८) विंडीजला चांगली सुरुवात करून दिली, परंतु युझवेंद्र चहलने त्याच्या पहिल्याच षटकात दोन्ही सलामीवीर माघारी पाठवले. निकोलस पूरनने ३४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ४१ धावा केल्या. रोव्हमन पॉवेलने ३२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ४८ धावा केल्या. मुकेश कुमार व अर्शदीप सिंग यांनी शेवटच्या षटकांत टिच्चून मारा करताना विंडीजच्या धावगतीला वेसण घातले. चहल व अर्शदीप यांनी प्रत्येकी दोन, तर कुलदीप यादव व हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. विंडीजला ६ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारता आली.
मॅकॉयने २८ धावांत २ विकेट्स घेतल्या. भारताच्या हातातून मॅच गेलीय असे वाटत असताना अर्शदीप सिंगने सलग २ चौकार खेचून मॅचमध्ये रोमांच आणला. ६ चेंडूंत १० धावा भारताला हव्या होत्या, परंतु कुलदीप यादव स्ट्राईकवर होता. रोमारिओ शेफर्डने पहिलाच चेंडू यॉर्कर टाकला अन् कुलदीपचा दांडा उडवला. युझवेंद्र चहलने १ धाव काढून अर्शदीपला स्ट्राईक दिली आणि त्याने २ धावा काढत ३ चेंडू ७ धावा अशी मॅच आणली. पुढील चेंडू निर्धाव पडला अन् पाचव्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात अर्शदीप १२ ( ७ चेंडू) धावांवर रन आऊट झाला. भारताला ९ बाद १४५ धावा करता आल्या. विंडीजने ४ धावांनी सामना जिंकला.