India vs West Indies 1st ODI Live Updates : वेस्ट इंडिजने पहिल्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची इंग्लंडमधील कामगिरी पाहून विंडीजने या मालिकेसाठी स्टार अष्टपैलू खेळाडूची वन डे संघात निवड केली होती, परंतु सामन्यापूर्वीच त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्याला या लढतीतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे विंडीजचे टेंशन वाढले आहे. भारतीय संघ मागील १६ वर्षांत वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे मालिका हरलेला नाही.
आतापर्यंत उभय संघांमध्ये झालेल्या १३६ वन डे सामन्यांत जय-पराजयाची आकडेवारी ही ६७-६३ अशी भारताच्या बाजूने आहे. क्विन्स पार्कवर २०११पासून भारतीय संघ पराभूत झालेला नाही. येथे झालेल्या ८ लढतींत भारताने विजय मिळवला आहे. रवींद्र जडेजा पहिल्या दोन वन डे सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे आणि श्रेयस अय्यरकडे उप कर्णधारपद सोपवले गेले आहे. शुबमन गिल व शिखर धवन सलामीला येणार आहेत. त्यानंतर श्रेयस, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा असा संघ आहे.
या मालिकेसाठी विंडीज संघात स्टार अष्टपैलू जेसन होल्डर ( Jason Holder) याचे पुनरागमन झाले होते. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याला विश्रांती दिली गेली होती आणि त्या मालिकेत विंडीजला हार पत्करावी लागली होती. त्यामुळे होल्डरचे पुनरागमन ही यजमानांसाठी मोठी गोष्ट होती. पण, त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो आजच्या सामन्यात खेळणार नसल्याचे कर्णधार निकोलस पूरनने सांगितले. कायले मेयर दुखापतीतून सावरून पुनरागमन करत आहे.