Join us

IND vs SL: भारताचा विजयरथ २७ वर्षांनंतर श्रीलंकेने रोखला, गंभीर-कोहलीचं 'टेन्शन' वाढलं!

Virat Kohli Gautam Gambhir, IND vs SL: गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील पहिलीच वनडे मालिका भारताने गमावली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 11:26 IST

Open in App

Virat Kohli Gautam Gambhir, IND vs SL 3rd ODI: श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने घरच्या मैदानावर इतिहास रचला. २७ वर्षांनंतर भारतीय संघ श्रीलंकेच्या भूमीवर द्विपक्षीय वनडे मालिकेत पराभूत झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत ०-२ असा पराभव पत्करावा लागला. या संपूर्ण मालिकेत नवा प्रशिक्षक गौतम गंभीर डगआउटमध्ये हतबल दिसून आला. तर विराट कोहली मैदानावर पुरता फ्लॉप ठरला.

वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ३२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. अशा स्थितीत भारताला शेवटची आणि तिसरी वनडे जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी होती, पण तसे होऊ शकले नाही. टीम इंडियाचा ११० धावांनी पराभव झाला आणि मालिकाही गमावली.

श्रीलंकेने २७ वर्षांनंतर घरच्या मैदानावर इतिहास रचला आहे. १९९७ नंतर प्रथमच त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात द्विपक्षीय वनडे मालिकेत पराभूत केले. यापूर्वी ऑगस्ट १९९७ मध्ये अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पराभव केला होता. त्यानंतर श्रीलंकेने ४ सामन्यांची वनडे मालिका ३-० ने जिंकली. त्यातही एक सामना अनिर्णित राहिला होता. भारतीय संघाने आतापर्यंत श्रीलंकेच्या भूमीवर यजमानांविरुद्ध एकूण १० द्विपक्षीय वनडे मालिका खेळल्या आहेत. यापैकी भारतीय संघाने ५ तर श्रीलंकेने ३ मालिका जिंकल्या आहेत. २ मालिका अनिर्णित राहिल्या.

कोच गंभीरचे 'टेन्शन' वाढलं...

मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिली एकदिवसीय मालिका होती आणि त्यात संघ पराभूत झाला. संपूर्ण मालिकेत तो डगआऊटमध्ये हतबल असल्याचे दिसून आला. सामन्यात भारतीय संघ फिरकीपटूंसमोर गुडघे टेकत असल्याचे दिसून येत होते, परंतु संघाची ही उणीव या मालिकेत दूर करण्यात गंभीर अपयशी ठरला. भारताच्या वरिष्ठ संघातील जवळपास सर्वच खेळाडू संघात असूनही असा मालिका पराभव झाल्याने गंभीरवर 'प्रेशर' नक्कीच वाढलं आहे.

विराट कोहली ठरला 'फ्लॉप'

मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहलीने केवळ ३८ धावा केल्या होत्या. त्याने दोन्ही वेळा सहज विकेट गमावली. संघासाठी ही चिंतेची बाब होती. तिसऱ्या सामन्यात कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र त्यातही तो २० धावा करून बाद झाला. त्याला या मालिकेत केवळ ५८ धावा करता आल्या. विराट कोहलीच्या दर्जाचा विचार करता अत्यंत खराब कामगिरी आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात कामगिरी उंचावण्याची विराटवर मोठी जबाबदारी असणार आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकागौतम गंभीरविराट कोहलीरोहित शर्मा