India vs South Africa, 3rd ODI : यशस्वी जैस्वालचं नाबाद शतक आणि विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भात्यातून आलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं विशाखापट्टणमच्या मैदानातील सामना एकतर्फी जिंकत ३ सामन्यांची वनडे मालिका २-१ अशी खिशात घातली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २७० धावा करत टीम इंडियासमोर २७१ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा ७५ धावा करून माघारी फिरला. त्यानंतर यशस्वी जैस्वालनं वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. विराट कोहलीनं सलग चौथ्या सामन्यात ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली. गोलंदाजीतील दमदार कामगिरीनंतर फलंदाजीतील हिटशोच्या जोरावर भारतीय संघाने ६१ चेंडू आणि ९ विकेट्स राखून सामन्यासह मालिकेवर कब्जा केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशस्वी-रोहितची क्लास खेळी! दोघांनी पहिल्या विकेटसाठी केली शतकी भागीदारी
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दिलेल्या २७१ धावांचा पाठलाग करताना यशस्वी आणि रोहित शर्मा जोडीनं अगदी संयमी खेळी करत संघाच्या डावाला आकार देण्याला पसंती दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५५ चेंडूत १५५ धावांची भागीदारी रचली. रोहित शर्मा शतक साजरे करेल, असे वाटत असताना केशव महाराज याच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याने ७३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७५ धावांची खेळी साकारली.
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
यशस्वीचं सेंच्युरी अन् कोहलीची कडक फिफ्टी
रोहित शर्माच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसल्यावर यशस्वी जैस्वालनं वनडे कारकिर्दीतील पहिली सेंच्युरी झळकावताना १२१ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११६ धावांची नाबाद खेळी केली. विराट कोहलीनं ४५ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने नाबाद ६५ धावा केल्या. एनिगडीच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार मारत कोहलीनं भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
क्विंटन डी कॉकनं शतकी खेळी केली, पण...
विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टॉसपासून सगळ्या गोष्टी भारतीय संघाच्या बाजूनं घडल्या. २ वर्षे आणि २० वनडे सामन्यानंतर नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूनं लागला. लोकेश राहुलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डीकॉकच्या शतकी खेळीनंतरही भारतीय गोलंदाजांनी अन्य फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडत दक्षिण आफ्रिकेचा डाव २७० धावांत आटोपला. कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या. याशिवाय अर्शदीप सिंग आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. गोलंदाजीतील चमकदार कामगिरीसह भारतीय संघाने अर्धी लढाई जिंकली होती. फलंदाजीत यशस्वी, रोहित आणि विराटच्चा दमदार खेळीच्या जोरावर ४० व्या षटकातच भारतीय संघाने मॅच संपवली.