IND vs SA Test, Who is Senuran Muthusamy : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने गुवाहाटीच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यात कॉर्बिन बॉशच्या जागी सेनुरन मुथुसामी याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. या पठ्ठ्यानं संधीच सोनं करताना दमदार अर्धशतकी खेळी करत भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले. पहिल्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाची अवस्था ६ बाद २४७ धावा अशी केली होती. दुसऱ्या दिवसाच्या खेळात टीम इंडिया ३०० धावांच्या आत दक्षिण आफ्रिकेला गुंडाळून पहिल्या डावाची सुरुवात करेल, अशी अपेक्षा होती. पण सेनुरन मुथुसामी याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावत संघाला मजबूत स्थितीत नेले आहे. याशिवाय पाकिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी साकारल्याचा रेकॉर्ड आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी आहे खास कनेक्शन
सेनुरन मुथुसामी याचे आई वडिल हे भारतीय वंशाचे आहेत. आजही त्याचे कुटुंबियातील सदस्य तामिळनाडूच्या नागपट्टिनम येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे प्रतिनिधीत्व करत असला तरी त्याचे भारताशी खास कनेक्शन आहे. कमालीचा योगोयोग हा की, मुथुसामी याने कसोटी पदार्पण हे भारताविरुद्धच केले होते. २०१९ मध्ये विशाखापट्टणमच्या मैदानातील कसोटी सामन्यात त्याने विराट कोहलीच्या रुपात आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली होती. केशव महाराज संघात असल्यामुळे त्याला फारच कमी संधी मिळते. पण ज्या ज्या वेळी संधी मिळेल त्या त्या वेळी तो बॅटिंग किंवा बॉलिंग दोन्हींपैकी एकात धमक दाखवतोच.
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
पाकिस्तान विरुद्ध मालिकावीर आता टीम इंडियासाठी ठरतोय डोकेदुखी
आशियाई मैदानात मुथुसामी कमालीच्या कामगिरीसह दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रम्प कार्ड ठरताना दिसत आहे. भारत दौऱ्याआधी पाकिस्तानच्या मैदानात त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत धमक दाखवली होती. लाहोर कसोटी सामन्यात ११ बळी आणि रावळपिंडी कसोटीत ८९ धावांच्या खेळीसह तो पाकिस्तान विरुद्ध मालिकावीर ठरला होता. आता दुसऱ्या सामन्यात तो टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरताना दिसतोय. चहापानाआधी मुथुसामी याने १३१ चेंडूत ५६ धावांची खेळी करत भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोट मालिकेत तो सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा फलंदाजही ठरला. याआधी कोलकाता कसोटीत टेम्बा बावुमानं अर्धशतक झळकावले होते.
आतापर्यंतची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी
- भारताविरुद्ध गुवाहाटी कसोटीत अर्धशतक
- पाकिस्तान विरुद्ध रावळपिंडी कसोटीत १५५ चेंडूत नाबाद ८९ धावा (२०२५)
- बांगलादेशविरुद्ध चट्टोग्राम कसोटीत ७५ चेंडूत नाबाद ६८ धावा (२०२४)
- भारताविरुद्ध विशाखापट्टणम कसोटीत दुसऱ्या डावात १०८ चेंडूत नाबाद ४८धावा (२०१९)
- भारताविरुद्ध विशाखापट्टणम कसोटीत पहिल्या डावात १०८ चेंडूत नाबाद ३३ धावा (२०१९)