South Africa Crush India By 408 Runs In Guwahati Seal Dominant 2-0 Clean Sweep : गुवाहाटी कसोटी सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावातील ४४९ धावा आणि दुसऱ्या डावातील २६० धावांच्या जोरावर टीम इंडियासमोर ५४९ धावांचे विक्रमी धावसंख्या उभारली होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ दुसऱ्या डावात १४० धावांत आटोपला. भारतीय संघाने गुवाहाटी कसोटी सामना ४०८ धावांनी गमावला. कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातील टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. याआधी २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला नागपूरच्या मैदानात ३४२ धावांनी पराभूत केल्याचा रेकॉर्ड होता.
२५ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेनं मिळवला ऐतिहासिक विजय
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवसाअखेरच पहिल्या दोन विकेट्स गमावल्या. पाचव्या आणि अखेरचा दिवस खेळून काढत सामना अनिर्णित राखण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला. पण पुन्हा एकदा फलंदाजीत फ्लॉप शो पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत करत मालिका २-० अशी आपल्या नावे केली. २५ वर्षांनी भारतीय संघाला व्हाइट वॉश देत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इतिहास रचला आहे.
आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेनं भारतीय मैदानात फक्त एकदाच जिंकली होती कसोटी मालिका, आता...
याआधी २००० मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर अशी नामुष्की ओढावली होती. हान्सी क्रोन्ये याच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाला २-० असे पराभूत केले होते. त्यानंतर आतापर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेला भारतीय मैदानात कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. अपराजित कर्णधार असा टॅग असलेल्या टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील २५ वर्षांचा दुष्काळ संपवत दक्षिण आफ्रिकेनं मालिका विजयाचा पराक्रम करुन दाखवला. घरच्या मैदानातील मागील तीन कसोटी मालिकेतील भारतीय संघाचा हा दुसरा लाजिरवाणा पराभव ठरला. याआधी न्यूझीलंडच्या संघाने टीम इंडियाला ३-० अशी क्लीन स्वीप दिली होती.
पहिल्या डावात २०१ धावांवर आटोपलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १४० धावांवर आटोपले. भारतीय संघाला या सामन्यात ४०८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय मैदानातील टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव ठरला. सायमन हार्मर याने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. केशव मराहाज याने २ तर मुथुसामी आणि मार्को यान्सेन याने प्रत्येकी एक एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.