Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहुण्यांना सहन होईना दिल्लीतील उकाडा, भारताचा मात्र कसून सराव

टी-२० मालिका : युवा खेळाडूंचा जोश, द्रविड यांनी दिल्या टिप्स, हार्दिकची अनुपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 11:15 IST

Open in App

नवी दिल्ली : येथील अरुण जेटली स्टेडियमवर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी दिल्लीतील उकाडा आणि उष्णता खेळाडूंची परीक्षा घेत आहे. पाहुण्या संघाचे खेळाडू उष्णतेमुळे त्रस्त असताना भारतीय खेळाडूंनी मात्र मंगळवारी सकाळच्या सत्रात आरामात सराव केला.

वेगवान गोलंदाज आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांनी ईशान किशन, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना गोलंदाजी करून यॉर्कर गोलंदाजीचा सराव केला. तर, अर्शदीप सिंग गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना दिसला. सराव सत्रात सर्वांच्या नजरा ‘जम्मू एक्स्प्रेस’ उमरान मलिकवर होत्या. त्याने सराव सत्रात श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि दीपक हुडा यांच्यासाठी गोलंदाजी केली. श्रीलंकेविरुद्ध मार्च महिन्यात अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर टीम इंडिया अडीच महिन्यानंतर मैदानावर उतरणार आहे. कर्णधार लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील मैदानावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडदेखील उपस्थित आहेत. 

अर्शदीपने बाटली ठेवून केली गोलंदाजीयुवा अर्शदीपने यॉर्करचा टिच्चून मारा करता यावा यासाठी गोलंदाजी कोच म्हांब्रे यांच्या मार्गदर्शनात खेळपट्टीवर ग्लोव्हज आणि वाईड लाईनदरम्यान बाटली ठेवून मारा केला. अर्शदीपने वेगवेगळे चेंडू टाकून या वस्तूंना लक्ष्य केले. चेंडू टाकल्यानंतर तो म्हांब्रेचा सल्ला घेत, ‘ठीक आहे का?’ अशी विचारणा करताना दिसला. म्हांब्रे यांनी त्याला चेंडूची दिशा आणि टप्पा याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.

हार्दिकची सरावाला दांडीअष्टपैलू हार्दिक पांड्या याची मात्र उणीव जाणवली. तो सरावासाठी मैदानावर दिसलाच नाही. सोमवारपर्यंत तो दिल्लीत दाखल झाला नव्हता. मंगळवारी येणार, असे सांगण्यात आले होते; मात्र तो आजही दिसला नाही.

द्रविडचा उमरानला २० मिनिटे सल्लाप्रथमच संघात आलेल्या वेगवान गोलंदाज उमरान मलिकला याला कोच राहुल द्रविड यांनी २० मिनिटे टिप्स दिल्या. यादरम्यान राहुल द्रविड हे वारंवार स्वत:चे बोट खेळपट्टीकडे दाखवीत होते. उमरानने आयपीएलमध्ये सनरायझर्सकडून १५७ किमी ताशी वेगाने मारा केला होता.

बाहेर फक्त ४२ अंश तापमान आहे...दिल्लीतील तापमानाचा विचार केल्यास वातावरणामध्ये प्रचंड उष्णता आहे. अगदी रात्रीचे तापमानदेखील ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असते. याचा अर्थ पाहुण्या खेळाडूंना राजधानीतील उष्णतेशी जुळवून घेताना कसरत करावी लागत आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सीने एक मिश्कील ट्विट करून दिल्लीतील हवामानाचे अपडेट्स दिले.  सराव सत्रात तबरेझ शम्सी आणि केशव महाराज ही फिरकी जोडी घाम गाळताना दिसली. तबरेझ शम्सीला दिल्लीच्या हवेतील उष्णता त्रासदायक वाटू लागली आहे. शम्सी लिहितो, ‘बाहेर फक्त ४२ अंश तापमान आहे.. अजिबात उष्णता नाही.’

पहिल्या लढतीची तिकिटे संपलीभारत-द. आफ्रिका यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर गुरुवारी होत असलेल्या पहिल्या टी-२० सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. येथील प्रेषक क्षमता ३५ हजार इतकी आहे.  नोव्हेंबर २०१९ नंतर येथे सामना होत असून  २७ हजार तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध होती. त्यातील ४०० ते ५०० तिकिटे राखीव ठेवण्यात आली आहेत. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मास्क घालूनच प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती  डीडीसीएचे संयुक्त सचिव राजन मानचंदा यांनी दिली.

टॅग्स :टी-20 क्रिकेट
Open in App