IND vs SA Womens World Cup 2025 Final : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिली वहिली विश्वचषक स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे. शफाली वर्माच्यासह दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने २९९ धावांचा बचाव करत फायनल बाजी मारली. अर्धशतकी खेळीनंतर दीप्ती शर्मानं पाच विकेट्सचा डाव साधत संघाला ५२ धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिसऱ्या प्रयत्नात भारतीय संघानं जिंकली पहिली वर्ल्ड कप स्पर्धा
२००५ आणि २०१७ मध्ये अधुरं राहिलेल स्वप्न हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघानं स्वप्ननगरीत साकार करून दाखवलं. भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने शतकी खेळी केली. तिने भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं होते. पण दीप्तीच्या गोलंदाजीवर तिने मोठा फटका खेळला अन् अमनजोत कौरनं तिसऱ्या प्रयत्नात कॅच पूर्ण करत भारतीय महिला संघाचा तिसऱ्या प्रयत्नात ट्रॉफी जिंकण्याचा मार्ग मोकळा केला.
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
२५ वर्षांनी वनडेत नवा वर्ल्ड कप विजेता
वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघाशिवाय वर्ल्ड कपची फायनल रंगल्याचे पाहायला मिळाले. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनलसह २५ वर्षानंतर नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळणार हे आधीच ठरलं होतं. अखेर तिसऱ्या प्रयत्नात भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप ट्रॉफीचं स्वप्न साकार केले. २००० मध्ये न्यूझीलंडच्या संघानंतर आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यानंतर वनडे वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा चौथा संघ ठरला आहे.
लॉराचं विक्रमी शतक व्यर्थ, टीम इंडियानं मारली फायनल बाजी
भारतीय महिला संघाने टॉस गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात २९८ धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर २९९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने सेमी फायनलनंतर फायनलमध्येही शतक करत वर्ल्ड रेकॉर्ड रचला. वर्ल्ड कपच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला. पण शेवटी भारतीय संघाने फायनल बाजी मारत अधुरं स्वप्न साकार केलं.