IND vs SA Captain Rishabh Pant Got Angry On Kuldeep Yadav : गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले आहे. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करताना दिसले. त्यात मैदानातील पंचांनी 'स्लो ओव्हर रेट'मुळे भारतीय संघाचा कर्णधार रिषभ पंतला दोन वेळा ताकीद दिली. याच गोष्टीवरून पंतनं कुलदीप यादववर राग काढल्याचे पाहायला मिळाली.
कुलदीपवर भडकला पंत; म्हणाला...
कुलदीप यादव गोलंदाजीला आल्यावर त्याने षटक टाकण्यास सुरुवात करायला थोडा वेळ घेतला. त्यामुळे पंत त्याच्या संतापल्याचे पाहायला मिळाले. पंत म्हणाला की,
यार ३० सेकंड का टाइमर है! घर पर खेल रहे हो क्या? एक बॉल डाल जल्दी कुलदीप… दो बार वॉर्निंग मिल चुकी है। पूरा एक ओवर थोड़ी ना चाहिए। मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को!. पंतची विकेट मागील कॉमेंट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
'स्लो ओव्हर रेट' वॉर्निंग, काय आहे ICC चा नियम?
ICC च्या 'स्लो ओव्हर रेट' नियमानुसार, एक षटक पूर्ण झाल्यावर ३० सेकंदाच्या आत दुसरे षटक सुरु करावे लागते. गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षकामुळे यात विलंब झाला तर मैदानातील पंच दोन वेळा ताकीद देतो. तिसऱ्यांदा पुन्हा ही घडली तर प्रतिस्पर्धी संघाला ५ धावा पेनल्टीच्या रुपात दिल्या जातात. ८० षटकानंतर पुन्हा नव्याने हे काउटींग सुरु होते. या नियमात अडकून संघाला नुकसान होऊ नये, यासाठी कर्णधार आपल्या स्टाइलमध्ये विकेट मागून 'बोलंदाजी' करताना दिसला.
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं उभारली मोठी धावसंख्या
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ६ बाद २४७ धावांवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. सेनुरन मुथुसामीचे दमदार शतक आणि मार्को यान्सेच्या कडक खेळीशिवाय काइल व्हेरेइन याने केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली आहे.