India vs South Africa, 4th T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-२० सामना लखनौच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी मोठी माहिती समोर येत आहे. टी-२० संघाचा उप कर्णधार शुभमन गिल चौथ्या टी-२० सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमधून आउट झाला आहे. पायाच्या दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे, असे वृत्त क्रिकबझने दिले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चौथ्या टी-२० सामन्यासाठी नाणेफेक ही साडे सहा वाजता होणं अपेक्षित होते. पण मैदानात धुके असल्यामुळे वेळेत टॉस होऊ शकलेला नाही. ६ वाजून ५० मिनिटांनी पंचांनी मैदानाची पाहणी केली. त्यानंतर आता ७ वाजून ३० मिनिटांनी पुन्हा निरीक्षण होईल आणि त्यानंतरच सामना कधी सुरु होणार ते चित्र स्पष्ट होईल.
शुभमन गिलच्या जागी कोण?
शुभमन गिल खरंच दुखापतग्रस्त आहे की, त्याला डच्चू मिळाला? हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. कारण आशिया कप स्पर्धेतून दोन वर्षांनी टी-२० मध्ये पदार्पण केल्यापासून तो डावाची सुरुवात करताना अडखळत खेळताना दिसला आहे. त्याच्यामुळे संजू सॅमसनवर अन्याय होत आहे, अशी चर्चाही रंगली. आता गिल बाहेर गेल्यावर संजू सॅमसन अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करताना पाहायला मिळू शकते. टॉसनंतरच प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार त्याचे उत्तर मिळेल.