India vs South Africa 4rth T20I Live Updates : रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसरा ट्वेंटी-२० सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जीवंत ठेवली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला चौथा सामना राजकोट येथे होणार आहे आणि तो भारतीय संघासाठी करो वा मरो असाच असणार आहे. आफ्रिकेने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतल्याने आजचा विजय त्यांच्यासाठी मालिका खिशात घालणारा ठरणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एडन मार्करामने एकही लढत न खेळता माघार घेतली आहे. पण, मागील सामन्यात दुखापतीमुळे न खेळू शकलेला क्विंटन डी कॉक पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे.
खराब फॉर्मशी झुंज देत असलेला कर्णधार
रिषभ पंतला आज दमदार कामगिरी करावी लागेल. भारतासाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असा असेल. विशाखापट्टनममधील तिसऱ्या सामन्यात पंत अपयशी ठरल्यानंतरही भारताने चुका सुधारून मोठा विजय साजरा केला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत चुरस कायम राखण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. असे झाल्यास मालिकेचा फैसला अखेरच्या सामन्यात होईल. भारताने तोच संघ कायम राखला आहे. त्यामुळे उम्रान मलिकचे पदार्पण लांबणीवर पडले आहे.
नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने जिंकला अन् प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रिषभने संघात कोणतेच बदल न करण्याचा निर्णय घेतला. पण आफ्रिकेचा संघ तीन बदलांसह मैदानावर उतरला.. कागिसो रबाडा, वेन पार्नेल व रिझा हेड्रिक्स यांच्या जागी आज मार्को येनसेन, क्विंटन डी कॉक व लुंगी एनगिडी खेळणार आहेत. रबाडा व पार्नेल दोघंही दुखापतग्रस्त झाले आहेत.