Join us  

SA win the test series 2-1 : स्वप्न ते स्वप्नच राहीलं!; दक्षिण आफ्रिकेनं कसोटी मालिका जिंकली, भारतीय संघानं इतिहास घडवण्याची संधी गमावली 

India vs South Africa, 3rd Test Day 4 Live Updates : दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न याहीवेळेस अपुरे राहिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 5:12 PM

Open in App

India vs South Africa, 3rd Test Day 4 Live Updates : दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न याहीवेळेस अपुरे राहिले. दुसऱ्या कसोटीत विराट कोहली जायबंदी झाला अन् त्याच्या अनुपस्थितीचा डाव साधून दक्षिण आफ्रिकेनं मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. तिसऱ्या कसोटीत विराटचे दमदार पुनरागमन झाले, परंतु अन्य सहकाऱ्यांनी माना टाकल्या. दक्षिण आफ्रिकेनं २१२ धावांचे माफक लक्ष्य पार करून मालिका २-१ अशी खिशात घातली. किगन पीटरसन हा आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला. आफ्रिकेनं ०-१ अशा पिछाडीवरून ही मालिका जिंकली.

रिषभ पंतच्या नाबाद शतकानं भारताला विजयाच्या आशा दाखवल्या होत्या, परंतु आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर व पीटसरन या जोडीनं त्या मावळून टाकल्या. आफ्रिकेच्या फलंदाजांची एकाग्रता भंग करण्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानं सारे प्रयत्न करून पाहिले. पण, त्याचा फार उपयोग झाला नाही, उलट विराट नेमका कोणता आदर्श ठेऊ इच्छितो असा सवाल अनेकांनी केला. लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांचे अपयश अन् आर अश्विन व शार्दूल ठाकूर या अष्टपैलू खेळाडूंच्या बॅटीनं दिलेला दगा भारताला महागात पडला.

रिषभनं ४ बाद ५८ धावांवरून टीम इंडियाचा डाव सावरताना विराटसोहत ९४ धावांची भागीदारी केली. विराट माघारी परतला अन् भारतीय फलंदाजांनी रांग लावली. भारताचा दुसरा डाव १९८ धावांवर गडगडला. त्यात  रिषभच्या नाबाद १०० धावा होत्या. त्यानं १३९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या . भारतानं दुसऱ्या डावात १९८ धावा करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले. 

एडन मार्कराम ( १६) याला माघारी पाठवून शमीनं भारताला विजयाचे स्वप्न दाखवले. पण, एल्गर व किगन पीटरसन यांनी त्या स्वप्नांचा चुराडा केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. एल्गर ९६ चेंडूंत ३० धावा केल्या. इथून आफ्रिका पराभूत होणे अशक्यच होते. पीटरसननं या सामन्यावर वर्चस्व गाजवताना एकहाती सामना फिरवला. चेतेश्वर पुजारानं त्याला जीवदान देऊन भारताचा विजयाचा दरवाजा बंद केला. पीटरसननं आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली अन् व्हॅन डेर ड्युसेनसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. 

शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा पार्टनरशीप ब्रेकर ठरला. त्यानं भारताला महत्त्वाची विकेट मिळवून देताना पीटरसनचा त्रिफळा उडवला. पीटसरन ११३ चेंडूंत १० चौकारांसह ८२ धावांवर माघारी परतला. पेव्हेलियनच्या दिशेनं पीटरसनचं साऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभं राहुन कौतुक केलं. या विकेटनं भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या, पण ड्युसेन व टेम्बा बवुमानं तसं होऊ दिले नाही. या दोघांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. वबुमा ३२, तर ड्युसेन ४१ धावांवर नाबाद राहिले. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App