Join us

IND vs SA 3rd Test : सुनील गावस्करांनी तिसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन निवडली, अजिंक्य रहाणेनं जागा कायम राखली

India vs South Africa 3rd Test : कंबरेत उसण भरल्यामुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घेणारा विराट कोहली ( Virat Kohli) केपटाऊन कसोटीत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 16:15 IST

Open in App

India vs South Africa 3rd Test : कंबरेत उसण भरल्यामुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घेणारा विराट कोहली ( Virat Kohli) केपटाऊन कसोटीत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. डीन एल्गरच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेनं जोहान्सबर्ग कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. आता तिसऱ्या कसोटीसाठी विराट संघात येणार असल्यामुळे कोणाला बाहेर बसवायचे हा प्रश्न मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व संघ व्यवस्थापनासमोर आहे. ३३ वर्षीय विराटचा हा ९९ वा कसोटी सामना असणार आहे. 

चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे या अनुभवी खेळाडूंवर संघाबाहेर होण्याची टांगती तलवार होती, परंतु जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना संघाचा डाव सावरला आणि स्वतःची कारकीर्दही वाचवली. या कसोटीत विराटच्या जागी हनुमा विहारीला संधी देण्यात आली होती. विहारीनं दोन्ही डावांत चांगली कामगिरी केली. त्यामुळे आता कोणाला संघाबाहेर बसवायचे, हा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे.  

दरम्यान, भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी विराट संघात येताच विहारीला बाहेर बसवले गेले पाहिजे, तर मोहम्मद सिराजच्या जागी उमेश यादव किंवा इशांत शर्मा यांच्यापैकी एकाला खेळवायला हवं, असे मत व्यक् तेले. दुसऱ्या कसोसटीत मांडीचे स्नायू ताणल्यामुळे सिराजला गोलंदाजी करता आली नव्हती. गावस्कर म्हणाले,''मोहम्मद सिराजची दुखापत वगळल्यास प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करावा, असे मला वाटत नाही. याच संघानं पहिली कसोटी जिंकली आहे. त्यामुळे विराटचे पुनरागमन होताच विहारीला बाकावर बसवले पाहिजे. सिराजच्या तंदुरूस्तीवर संघ व्यवस्थापनाला किंचितशी शंका असेल, तर त्याला विश्रांती द्यावी. त्याच्या जागी उमेश किंवा इशांत यांच्यापैकी एकाला संधी द्यावी.''

संघ व्यवस्थापन अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यामागे ठामपणे उभे आहेत आणि त्यामुळे त्यांच्यापैकी एकाचा पत्ता कट होणे अवघड आहे, असेही ते म्हणाले. ''अनुभव पाठीशी असल्यामुळे संपूर्ण संघ त्या दोघांच्या मागे उभा आहे आणि त्यांचे भारतासाठीचे योगदान दुर्लक्ष करण्यासारखे नाही. त्यांनी चांगला खेळ करून दाखवला आहे. त्यामुळे जरी आपल्याला वाटत असले की युवा खेळाडूंना संधी मिळायला हवी, तरी सीनियर खेळाडू जोपर्यंत चांगली कामगिरी करतात, तोपर्यंत युवा खेळाडूंना वाट पाहावी लागेल,''असेही त्यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकासुनील गावसकरअजिंक्य रहाणेविराट कोहली
Open in App