Join us  

Ajinkya Rahane, India vs South Africa 3rd Test: 'जा आणि फर्स्ट क्लास क्रिकेट खेळ'; मुंबईकर माजी क्रिकेटपटू अजिंक्यवर भडकला

"अजिंक्य रहाणे गेली ३-४ वर्षे जे क्रिकेट खेळतोय त्यावरून तो फॉर्ममध्ये परतेल असं वाटत नाही."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 10:01 AM

Open in App

India vs South Africa 3rd Test: भारतीय संघाने पहिल्या डावात १३ धावांची निसटती आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावात टीम इंडियाने अतिशय खराब कामगिरी केली. १९८ धावांवर भारताचा संपूर्ण डाव आटोपला. ऋषभ पंतने एकट्याने झुंजार खेळी करत शतक झळकावलं. पण इतर कोणत्याही खेळाडूला फारशी चांगली फलंदाजी करणं शक्य झालं नाही. मालिकेच्या सुरूवातीपासूनच टीकेचं लक्ष्य ठरलेल्या अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा निराश केले. दुसऱ्या डावात झटपट गडी बाद होत असताना रहाणेकडून संयमी खेळीची अपेक्षा होती. पण रहाणे केवळ एक धाव काढून बाद झाला. त्याच्या या खेळीवर माजी मुंबईकर खेळाडू चांगलाच भडकला आणि त्याला पुन्हा फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला.

"रहाणे ज्या पद्धतीने बाद झाला, त्याला चांगल्या गोलंदाजीसह अजिंक्य रहाणेचा फॉर्मदेखील कारणीभूत आहे. आता अजिंक्य रहाणेने पुन्हा देशांतर्गत रणजी आणि इतर फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला हवं. कदाचित तेथे खेळल्यावर तो लयीत परतेल. मी तरी अशा कामगिरीनंतर रहाणेला पुन्हा संधी दिली नसती. पुजाराने गेल्या काही वर्षात जे केलंय त्यामुळे त्याला मी संघाबाहेर करणार नाही. पण रहाणे गेली ३-४ वर्षे जे क्रिकेट खेळतोय त्यावरून तो फॉर्ममध्ये परतेल असं वाटत नाही. मेलबर्न कसोटीत त्याने एक शतक झळकावलं. पण बाकी तो काहीच करू शकलेला नाही", असं रोखठोक मत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने व्यक्त केलं.

"रहाणे ज्या चेंडूवर बाद झाला त्यात रहाणेने फूटवर्क केलंच नाही. चेंडूचा बाऊन्स आणि स्विंग जरी लक्षात घेतला तरी अजिंक्यने स्वत:लाच विचित्र स्थितीत अडकवलं आणि त्याची विकेट गेली. जर मी राहुल द्रविडच्या जागी असतो आणि मी परदेशात कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या चांगल्या फलंदाजांच्या शोधात असतो तर रहाणेची संधी संपली असंच माझं मत असतं. रहाणेच्या जागी नव्या दमाच्या खेळाडूंना नक्कीच संधी मिळायला हवी", असंही मांजरेकर स्पष्टपणे म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाअजिंक्य रहाणेभारतीय क्रिकेट संघ
Open in App