गुरुवारी मुल्लानपूर येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१४ धावांचे मोठे लक्ष्य गाठताना भारतीय संघ १९.१ षटकांत १६२ धावांवरच गारद झाला. या पराभवानंतर भारताने या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दरम्यान, माजी भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पा याने मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या फलंदाजीच्या रणनीतीवर आणि लवचीकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जास्त लवचीकता दाखवल्याने धावा करणे कठीण होते, असे स्पष्ट मत उथप्पाने व्यक्त केले.
जिओ हॉटस्टारवर बोलताना उथप्पाने सांगितले की, "भारताचा सलामीवीर शुभमन गिल बाद झाल्यानंतर संघाच्या रणनीतीत मोठा बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. भारताकडे मजबूत फलंदाजी असूनही संघाने तिचा प्रभावीपणे वापर केला नाही. शुभमन गिल बाद झाला तेव्हा, अक्षर पटेल फलंदाजीसाठी आला. अक्षर पटेल जोखीम घेईल आणि अभिषेक शर्मावरील दबाव कमी करण्यासाठी जलद धावा करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, अक्षर पटेलने २१ धावांची संथ खेळी केली आणि तो संघावरील दबाव कमी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे भारताने एकामागून एक विकेट्स गमावली. आंतरराष्ट्रीय स्तरावर, फलंदाजांना त्यांची भूमिका आणि डाव कसा पुढे न्यायचा याची स्पष्ट समज असणे आवश्यक आहे, असेही तो म्हणाला.
उथप्पाने मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोठी भागिदारी रचण्याच्या गरजेवर भर दिला. तो म्हणाला की, "पहिल्या सहा ते आठ षटकानंतर फलंदाजीमध्ये बदल करणे ठीक आहे. परंतु, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मजबूत पाया आवश्यक आहे. मजबूत पायाशिवाय तुम्ही गगनचुंबी इमारत बांधू शकत नाही. एकाच सामन्यात खेळाडूंकडून अनेक भूमिका बजावण्याची अपेक्षा केल्याने गोष्टी गुंतागुंतीच्या होतात आणि इथेच भारत अपयशी ठरत आहे", असे तो म्हणाला. सलामवीरांच्या आणि डावाच्या सुरुवातीला फलंदाजीत वारंवार बदल करण्याची गरज नाही, असे उथप्पाच्या बोलण्यातून स्पष्ट होते.
तिसरा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा
तिसरा टी-२० सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या सामन्यातील विजय संघाला मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून देईल. भारताला त्यांची फलंदाजीची रणनीती अधिक स्पष्ट आणि आक्रमक ठेवावी लागणार आहे.