Join us  

India vs South Africa 3rd ODI: भारताविरूद्ध क्विंटन डी कॉकचा मोठा पराक्रम, मोडला तेंडुलकरचा विक्रम; टीम इंडियाला विजयासाठी दिलं २८८ धावांचं लक्ष्य

क्विंटन डी कॉकने गोलंदाजांची धुलाई करत १२४ धावांची खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 6:44 PM

Open in App

Ind vs SA 3rd ODI Live Updates: दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाविरूद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात ५० षटकात २८७ धावांपर्यंत मजल मारली. अनुभवी क्विंटन डी कॉकचे शतक आणि रॅसी वॅन डर डुसेनचे अर्धशतक यांच्या जोरावर आफ्रिकेने टीम इंडियाला पुन्हा एकदा आव्हानात्मक लक्ष्य दिले. भारताच्या संघात चार बदल करण्यात आले होते. त्यापैकी आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या प्रसिध कृष्णाने सर्वाधिक ३ तर दीपक चहरने २ बळी घेत आपली निवड सार्थ ठरवली.

क्विंटन डी कॉकने भारताविरोधात केला पराक्रम

सामन्यात संधी मिळालेल्या दीपक चहरने दक्षिण आफ्रिकेला सुरूवातील दोन धक्के दिले. तर केएल राहुलच्या चपळ फिल्डिंगमुळे कर्णधार बावुमा स्वस्तात बाद झाला. त्यामुळे आफ्रिकेचा स्कोअर ३ बाद ७० होता. त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि रॅसी वॅन डर डुसेन या जोडीने भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. डी कॉकने फटकेबाजी करत शतक ठोकलं. त्याने भारताविरूद्ध मोठा पराक्रम केला. डी कॉकचं हे भारताविरूद्ध वन डे सामन्यातील सहावं शतक ठरलं. त्याने एबी डिव्हिलियर्स, कुमार संगाकारा आणि रिकी पॉन्टींग यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. या यादीत श्रीलंकेचा सनथ जयसूर्या ७ शतकांसह अव्वल स्थानी आहे.

मोडला सचिन, सेहवागचा विक्रम

क्विंटन डी कॉकने सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडला. दक्षिण आफ्रिका-भारत यांच्यातील उभय देशांतील वन डे मालिकेत सचिनच्या नावावर पाच शतकं आहेत. पण डी कॉकने आज सहावं शतक ठोकत तेंडुलकरच्या विक्रमाला ओव्हरटेक केलं. तसेच, त्याने सेहवागचाही विक्रम मोडला. एकाच संघाविरूद्ध जलदगतीने सहा वन डे शतकं ठोकण्याचा विक्रम आतापर्यंत सेहवागच्या नावे होता. त्याने २३ डावांमध्ये न्यूझीलंड विरूद्ध सहा शतकं ठोकली होती. पण डी कॉकने भारताविरूद्ध केवळ १६ डावात ही किमया केली.

डी कॉकने डुसेनसोबत १४४ धावांची भागीदारी केली. डी कॉकला उसळत्या चेंडूवर बुमराहने बाद केले. डी कॉक १२४ धावांवर बाद झाला. त्याच्या पुढच्या षटकात डुसेनही ५२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी थोडी थोडी फटकेबाजी करत संघाला २८७ धावांपर्यंत नेलं. भारताकडून प्रसिध कृष्णाला सर्वाधिक ३, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह २-२ तर चहलने १ बळी टिपला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाक्विन्टन डि कॉकजसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघ
Open in App