Join us  

KL Rahul, India vs South Africa 3rd ODI: वाह राहुल.. तेरा जवाब नहीं!! आफ्रिकन कर्णधाराला लांबून थ्रो करून केलं रन आऊट

टेंबा बवुमा चोरटी धाव घेण्यासाठी धावला खरा पण त्याला धाव पूर्ण करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 3:38 PM

Open in App

IND vs SA 3rd ODI Live Updates: भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून यजमान दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. आफ्रिकेच्या आजच्या डावाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर यानामन मलान तिसऱ्याच षटकात माघारी परतला. दीपक चहरने त्याला बाद केले. त्यानंतर अनुभवी क्विंटन डी कॉकने कर्णधार टेंबा बवुमाच्या साथीने डाव पुढे नेला. पण दीपक चहरच्या गोलंदाजीवरच पुन्हा एकदा आफ्रिकेला धक्का बसला. चहरने टाकलेला चेंडू हळूच टोलवून एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बवुमा धावचीत झाला. राहुलने अप्रतिम थ्रो करत त्याला माघारी धाडले.

पहिल्या दोन सामन्यात संधी न मिळालेला दीपक चहर तिसऱ्या सामन्यात चमकला. त्याने आफ्रिकेला पहिला धक्का खूप लवकर दिला. त्यानंतर भागीदारी बनण्यास सुरूवात झाल्यानंतर भारताला दिलासा मिळाला. चहरने बवुमाला ऑफ साईडला चेंडू टाकला. तो चेंडू त्याने राहुलच्या दिशेने मारला. चेंडू हळूच मारून एक धाव घ्यायची असा बवुमाचा प्लॅन होता, पण तो फसला. राहुलच्या हातात बॉल गेल्यानंतर त्याने लगेचच लांबून थ्रो स्टंपवर मारला. चेंडू स्टंपला लागला आणि तिसऱ्या पंचांनी रिप्लेमध्ये पाहून बवुमा बाद असल्याचं सांगितलं. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, भारतीय संघाने पहिले दोन सामने हरले. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात चार बदल करण्यात आले. अनुभवी रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांना संघातून वगळण्यात आले. तसेच, शार्दुल ठाकूर व व्यंकटेश अय्यरलाही बाहेर बसवण्यात आलं. त्यांच्या जागी दीपक चहर, जयंत यादव, सूर्यकुमार यादव आणि प्रसिध कृष्णा या चौघांना संघात स्थान देण्यात आले. भारताने पहिली कसोटी वगळता या दौऱ्यावर एकही सामना जिंकलेला नाही. वन डे मालिकादेखील भारताने आधीच गमावली आहे, त्यामुळे आजचा सामना जिंकून किमान लाज राखावी असा फॅन्सचा सूर आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकालोकेश राहुलशार्दुल ठाकूरभारतीय क्रिकेट संघ
Open in App