India vs South Africa, 3rd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी निर्णायक व तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेची हालत खराब केली. नाणेफेक जिंकून कर्णधार शिखर धवनने गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव व शाहबाज अहमद यांनी तो सार्थ ठरवला. कुलदीपची हॅटट्रिक हुकली, पण त्याने ४.१-१-१८-४ अशी उल्लेखनीय कामगिरी केली.
कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही, परंतु आफ्रिकेने सलग तिसऱ्य़ा सामन्यात कर्णधार बदलला. लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुकवायो व मार्को येनसेन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले असून केशव महाराज, वेन पार्नेल व कागिसो रबाडा यांना विश्रांती दिलीय. डेव्हिड मिलर आजच्या सामन्यात आफ्रिकेचे कर्णधारपद भूषवित आहे. तिसऱ्याच षटकात आफ्रिकेला धक्का बसला. वॉशिंग्टन सुंदरने तिसऱ्या षटकात क्विंटन डी कॉकला ( ६) माघारी पाठवले. भारतीय गोलंदाजांनी कमाल करताना पहिल्या १० षटकांत २६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
मोहम्मद सिराज व आवेश खान यांनी आज प्रभावी गोलंदाजी केली. सिराजने आफ्रिकेला दोन मोठे धक्के देताना यानेमन मलान ( १५) व रिझा हेंड्रीक्स ( ९) यांना माघारी पाठवले. बदली खेळाडू म्हणून आलेल्या रवी बिश्नोईने सुरेख झेल टिपला. त्यानंतर शाहबाज अहमदने ( Shahbaz Ahmed) एडन मार्कराम ( ९) याला यष्टिरक्षक संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. त्यानंतर वॉशिंग्टनने सामन्यातील दुसरी विकेट घेताना डेव्हिड मिलरला ( ७) त्रिफळाचीत केले. पुढील षटकात
कुलदीप यादवने अँडिले फेहलुकवायोचा ( ५) त्रिफळा उडवला अन् आफ्रिकेची ६ बाद ७१ धावा अशी दयनीय अवस्था झाली.
हेनरिच क्लासेन आफ्रिकेसाठी खिंड लढवत होता. त्याने ४२ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या आणि शाहबाजने त्याचा त्रिफळा उडवून मोठं यश मिळवले. पुढच्याच षटकात कुलदीपने आफ्रिकेच्या बीजॉर्न फॉर्च्युनला ( १) पायचीत केले. एनरिच नॉर्खियाचा त्रिफळा उडवून कुलदीपने सलग दुसरी विकेट घेतली. लुंगी एनगिडीने भारतीय गोलंदाजाची हॅटट्रिक पूर्ण होऊ दिली नाही. पण, पुढच्या षटकात कुलदीपने विकेट घेताना आफ्रिकेचा डाव ९९ धावांत गुंडाळला. कुलदीपने ४.१ षटकांत १८ धावांत ४ विकेट्स घेतल्या. भारताविरुद्धची ही आफ्रिकेची निचांक कामगिरी ठरली. यापूर्वी १९९९ मध्ये नैरोबी येथे झालेल्या वन डेत त्यांना ११७ धावा करता आल्या होत्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"