IND vs SA 2nd Test (Marathi News) : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी कसोटी दोन दिवसांत संपतेय की काय अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघ ऑल आऊट झाले आणि दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २ विकेट्सही गमावल्या. कर्णधार डिन एल्गर याची विकेट मिळवल्यानंतर विराट कोहलीने सेलिब्रेशन करणं टाळलं, उलट त्याने आफ्रिकेच्या फलंदाजाला जाऊन मिठी मारली आणि रोहित शर्मानेही त्याची पाठ थोपटली.
मोहम्मद सिराजने ९-३-१५-६ अशी भन्नाट गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर गुंडाळला होता. जसप्रीत बुमराह व मुकेश कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, रोहित शर्मा ( ३९) व शुबमन गिल ( ३६) यांनी चांगला खेळ करून सावरलेला डाव नांद्रे बर्गरने बिघडवला. त्यानंतर लुंगी एनगिडी व कागिसो रबाडा यांच्या ११ चेंडूंत भारताने ६ विकेट्स गमावल्या. विराट कोहली ४६ धावांवर बाद झाला. लुंगी एनगिडीने एकाच षटकात लोकेश राहुल (८), रवींद्र जडेजा ( ०) व जसप्रीत बुमराह ( ०) यांना माघारी पाठवले. पुढच्याच षटकात कागिसो रबाडाने विराटची ( ४६) विकेट मिळवून दिली. त्यानंतर मोहम्मद सिराज रन आऊट झाला आणि प्रसिद्ध कृष्णा ( ०) झेल देऊन माघारी परतला. आफ्रिकेने भारताचा डाव १५३ धावांवर गुंडाळला.
भारताला पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी घेता आली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. भारताने शून्य धावेवर या ६ विकेट्स गमावल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सहा विकेट्स शून्यावर पडल्या आहेत. यापूर्वी शून्य धावेवर ४ विकेट्स पडल्याच्या ४५, तर शून्यावर ५ विकेट्सच्या तीन प्रसंग घडलेले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर ( १२) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. त्याची ही कारकीर्दितील अखेरची कसोटी मॅच होती आणि तो बाद होताच विराट कोहलीने त्याला नमन केले आणि गळाभेट घेतली. मुकेश कुमारने ही विकेट मिळवून दिली. मुकेशने आफ्रिकेच्या टॉनी जॉर्जीला बाद करून दुसरा धक्का दिला.
डीन एल्गरची कसोटी कारकीर्द
सामने - ८६
इनिंग्ज - १५२
धावा - ५३४७
सरासरी - ३७.६५
५०/१०० - २३/१४
सर्वोत्तम - १९९