IND vs SA 2nd Test (Marathi News) : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी २३ विकेट्स पडल्या आहेत. दोन्ही संघांचा पहिला डाव गडगडला असून यजमान दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावातही घसरगुंडी झालेली पाहायला मिळतेय. मुकेश कुमारने दोन धक्के दिल्यानंतर जसप्रीत बुमराहने अप्रतिम चेंडूवर आफ्रिकेला दुसऱ्या डावातील तिसरा धक्का दिला. बुमराहने ही विकेट घेताच कसोटी क्रिकेटमधील १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम तुटला.
भारताला पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी घेता आली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर ( १२) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. मुकेश कुमारने ही विकेट मिळवून दिली. मुकेशने त्याच्या पुढच्या षटकात आफ्रिकेच्या टॉनी जॉर्जीला बाद करून दुसरा धक्का दिला. जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम चेंडूवर त्रिस्तान स्टब्स ( १) माघारी परतला आणि आफ्रिकेला ४५ धावांवर तिसरा धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेतील कसोटीच्या एका दिवसात २३ विकेट्स पडण्याची ही दुसरी वेळ ठऱली. २०११ मध्ये आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी २३ विकेट्स पडल्या होत्या. १८९६मध्ये आफ्रिका वि. इंग्लंड यांच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी २१ विकेट्स पडलेल्या आणि आज हा विक्रम तुटला गेला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वाधिक विकेट्स पडल्याची ही दुसरी वेळ ठरली.