Join us

IND vs SA, 2nd Test Live Updates : कर्णधार लोकेश राहुल अन् आर अश्विननं लाज राखली, तरीही टीम इंडियानं पहिल्या डावात शरणागती पत्करली 

India vs South Africa, 2nd Test Live Updates : विराट कोहलीच्या अनुपस्थितीचे दडपण टीम इंडियाच्या खेळावर प्रकर्षानं जाणवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 19:36 IST

Open in App

India vs South Africa, 2nd Test Live Updates : विराट कोहलीच्या अनुपस्थितीचे दडपण टीम इंडियाच्या खेळावर प्रकर्षानं जाणवले. विराटचे आजच्या सामन्यात नसणे हे दक्षिण आफ्रिकेला प्रचंड मानसिक समाधान देणारे ठरले. भारताकडून कर्णधार लोकेश राहुल आणि आर अश्विन वगळता इतरांनी निराशाजनक कामगिरी केली. लोकेशच्या अर्धशतकानंतर अश्विनच्या ४६ धावांनी टीम इंडियाला समाधानकारक मजल मारून दिली. जोहान्सबर्गवर भारताकडून ७व्या क्रमांकाच्या फलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम खेळी ठरली.  मार्को जॅन्सेन, ड्युआने ऑलिव्हर आणि कागिसो रबाडा यांनी चांगली गोलंदाजी केली. ५ बाद ११६ अशी अवस्था असताना अश्विन मैदानावर उतरला अन् समाधानकारक पल्ला गाठून दिला.  

लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं सावध सुरुवात केली. मयांक अग्रवाल चांगल्या टचमध्ये दिसला, तर लोकेश दुसऱ्या बाजूनं विकेट टिकवून खेळत होता. पण, मयांकची विकेट गेली अन् मधल्या फळीतीत मजबूत  भिंत पुन्हा ढासळली. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना पुन्हा अपयश आले. लोकेश व मयांक यांची ३६ धावांची भागीदारी जॅन्सेननं संपुष्टात आणली. मयांक २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर पुजारा व लोकेश यांनी १३ धावांची भागीदारी केली. ऑलिव्हरनं २४व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अप्रतिम बाऊन्सरवर पुजाराला ( ३) माघारी जाण्यास भाग पाडले. पुढच्याच चेंडूवर अजिंक्य ( ०) स्लीपमध्ये झेल देऊन माघारी परतला. लोकेश व हनुमा विहारी यांनी चौथ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. विहारीला ८ धावांवर असताना जीवदान मिळालं आणि त्याचा फॉर्म पाहता तो आज मोठी खेळी करेल असे वाटले होते. पण, कागिसो रबाडाच्या अफलातून चेंडूवर रॅसी व्हॅन डेर ड्युसेननं सिली पॉईंटला भारी कॅच घेतला. विहारी २० धावांवर माघारी परतताच लोकेशह त्याची ४२ धावांची भागीदारीही संपुष्टात आली. लोकेशनं संयमी खेळ दाखवताना कर्णधार म्हणून पहिले व एकूण १३ वे अर्धशतक पूर्ण केले. पण, लोकेशच्या मोठ्या खेळीकडे आस लावून बसलेल्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. जॅन्सेनच्या चेंडूवर लोकेशनं पूल शॉट मारला, परंतु कागिसो रबाडानं तितक्याच अप्रतिमपद्धतीनं तो टिपला. लोकेश १३३ चेंडूंत ९ चौकारांसह ५० धावांवर बाद झाला. रिषभ पंत व आर अश्विन यांनी झपटप ४० धावा जोडल्या, परंतु जॅन्सेननं पंतला बाद केले. शार्दूल ठाकूर ( ०) ऑलिव्हरच्या बाऊन्सरच्या जाळ्यात अडकला. अश्विननं टीम इंडियाला मोठा आधार दिला. त्यानं आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. जॅन्सेननं ही महत्त्वाची विकेट घेतली. जॅन्सेनच्या चेंडूवर अपर कट मारण्याच्या प्रयत्नात अश्विन झेलबाद झाला. त्यानं ५० चेंडूंत ६ चौकारासह ४६ धावा केल्या. भारताचा पहिला डाव २०२ धावांवर संपुष्टात आला. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकालोकेश राहुलआर अश्विन
Open in App