Join us  

Video: रोहितचा स्पेशल प्लॅन अन् सिराजची भन्नाट बॉलिंग... डीन एल्गारचा उडाला त्रिफळा

रोहित-सिराजने रचलेल्या सापळ्यात एल्गार अलगद अडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 3:18 PM

Open in App

Rohit Sharma Siraj Plan, Dean Elgar: भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील शेवटच्या टप्प्यात कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत भारताला आफ्रिकेकडून डावाने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही अतिशय सुमार दर्जाची कामगिरी केली. पण दुसऱ्या कसोटीत मात्र खेळ बदलला. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांचा तो निर्णय फसला. त्यातही भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने रचलेल्या सापळ्यात गेल्या सामन्यातील शतकवीर डीन एल्गार अलगद अडकला आणि त्याला स्वस्तात माघारी जावे लागले. सिराजने भन्नाट गोलंदाजी करत रोहितचा प्लॅन यशस्वी केला.

काय होता रोहितचा प्लॅन? सिराजने कसा केला यशस्वी?

आफ्रिकन सलामीवीर एडन मार्करम अवघ्या २ धावा काढून माघारी परतला. पहिल्या सामन्यातही तो असाच लवकर बाद झाला होता. पण दुसरा सलामीवीर डीन एल्गार हा गेल्या सामन्याचा शतकवीर होता. त्याने भारताला चांगलेच रडवले होते. या सामन्यातही तो एक बाजू लावून धरेल आणि सामना भारतापासून दूर नेईल असा अंदाज होता. पण रोहित शर्माने प्लॅनिंग करून त्याला माघारी धाडले. एल्गार पायाच्या रेषेतील चेंडू लेग साईडला मारत असल्याचे पाहताच, रोहित स्वत: हेल्मेट घालून शॉर्ट लेगवर उभा राहिला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर एक झेल आला पण तो काहीसा दूर पडला. त्यापुढच्या चेंडूवर रोहितने पॉईंटची जागा फलंदाजाच्या शॉटसाठी मोकळी ठेवली होती. सिराजने प्लॅन प्रमाणे ऑफ साईडला शरीराच्या जवळ चेंडू टाकला. पॉईंटच्या दिशेने चेंडू मारल्यास चौकार मिळेल हा फलंदाजाचा अंदाज होता. डीन एल्गार त्याचप्रकारे फटका मारायला गेला, पण चेंडू स्विंग झाला आणि बॅटला लागून एल्गार त्रिफाळाचीत झाला.

दरम्यान, सामन्यात सिराजने पहिल्या दीड तासाच्या खेळात तुफान गोलंदाजी केली. आफ्रिकन गोलंदाजांना चाळीशी गाठेपर्यंत ६ बळी गमवावे लागले, त्यात ५ बळी एकट्या सिराजचे होते. बुमराहने केवळ ट्रिस्टन स्टब्सचा अडथळा दूर केला.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्मामोहम्मद सिराजद. आफ्रिकाभारत