IND vs SA 2nd ODI Virat Kohli Hits Third Back To Back 50 Plus Score And Gautam Gambhir Reaction : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातही कामगिरीतील सातत्य कायम राखत विराट कोहलीनं दमदार खेळीचा नजराणा पेश केला. षटकारानं खाते उघडणाऱ्या कोहलीनं या सामन्यात सलग तिसऱ्यांदा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनीच्या मैदानातील अर्धशतकी खेळीनंतर तो सातत्याने धमाकेदार कामगिरी करताना दिसला. त्याच्या या खेळीनंतर कॅमेरा थेट ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या गौतम गंभीरकडेही वळल्याचे पाहायला मिळाले. कोहलीच्या अर्धशतकानंतर कोच गंभीरनं टाळ्या वाजवून दिलेली दाद चर्चेचा विषय ठरत आहे.
टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर विराट कोहली फक्त वनडेत सक्रीय आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विराट कोहलीला खातेही उघडता आले नव्हते. वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याच्यावर सलग दोन वेळा शून्यावर बाद होण्याची वेळ आली होती. पण सिडनीच्या तिसऱ्या वनडेत कोहलीनं दमदार अर्धशतक झळकावले. हाच फॉर्म त्याने घरच्या मैदानातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही कायम ठेवला आहे. रांची वनडेत त्याने १३५ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्यात आता आणखी एक मोठी खेळी त्याच्या भात्यातून पाहायला मिळत आहे.
संघातील सहकाऱ्यांसह कोच गंभीरनं टाळ्या वाजवून दिली दाद
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात मतभेद असल्याची गोष्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. रांचीच्या सामन्यात सेंच्युरीनंतर गौतम गंभीरनं ड्रेसिंग रुममध्ये कोहलीची गळाभेटही घेतल्याचे पाहायला मिळाले होते. पण विराटनं त्याला फार भाव दिला नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचे पाहायला मिळाले. कोचसोबतच्या मतभेदाचा वारं वाहत असताना तो सातत्याने दमदार खेळी करत स्वत:मधील धमक दाखवून देत आहे. त्याची कडक खेळीला ड्रेसिंग रुममध्ये गौतम गंभीरही सातत्याने दाद देताना दिसत आहे.