India vs South Africa, 1st Test : टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील WTC चॅम्पियन दक्षिण आफ्रिका संघाने दमदार कमबॅक करून दाखवत घरच्या मैदानावर भारतीय संघाला पराभूत केले आहे. कोलकाताच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामना ३० धावांनी जिंकत पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हा सामना तिसऱ्या दिवशी संपणार हे पक्के होते, पण सामना दक्षिण आफ्रिका जिंकेल, अशी अपेक्षा कुणी केली नव्हती. पण पाहुण्या संघाने कमालीच्या कामगिरीसह १५ वर्षांनी टीम इंडियात कसोटी जिंकण्याचा डाव साधला. या विजयासह टेम्बा बावुमाचा एकही कसोटी सामना न गमावण्याचा रेकॉर्ड कायम राहिला.
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात १५९ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने पहिल्या डावात १८९ धावा करत पहिल्या डावातील खेळानंतर ३० धावांची अल्प आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कर्णधार टेम्बा बावुमाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १५३ धावा करत टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट सेट केले. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ दुसऱ्या डावात ९३ धावांत आटोपला. टीम इंडियाने जेवढ्या धावांची आघाडी घेतली तेवढ्याच धावांनी संघावर पराभवाची नामुष्की ओढावली. कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे बाहेर पडणं हे टीम इंडियाला चांगलेच महागात पडले.
दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या १२४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवातच खराब झाली. यशस्वी जैस्वाल ४ चेंडूचा सामना करुन खातेही न उघडता माघारी फिरला. केएल राहुलही एका धावेची भर घालून माघारी परतला. वॉशिंग्टन सुंदरनं ९२ चेंडूत केलेल्या ३१ धावा, अक्षर पटेल २६ (१७), रवींद्र जडेजा १८ (२६) आणि ध्रुव जुरेल १३ (३४) धावा वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाढता आला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून सायमन हार्मर याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. केशव महाराज आणि मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी २-२ तर मार्करमन एक विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने एकमेव अर्धशतक झळकावले. घरच्या मैदानात भारतीय खेळाडूंच्या ताफ्यातून एकही अर्धशतक पाहायला न मिळण्याची ही पहिली वेळ ठरली.