भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या द.आफ्रिकेच्या संघाला अवघ्या १५९ धावांवर रोखले. या सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांनी द. आफ्रिकेच्या संघाचा निर्णय चुकीचा ठरवला. द.आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या १५९ धावांवर आटोपला. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (५ विकेट्स), मोहम्मद सिराज ( २ विकेट्स), फिरकीपटू अक्षर पटेल (१ विकेट) आणि कुलदीप यादवने (२ विकेट्स) दमदार गोलंदाजी केली. या सामन्यात कुलदीप यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत घरच्या मैदानावर १५० विकेट्स घेण्याचा विक्रम रचला. अशी कामगिरी करणारा तो ९वा भारतीय ठरला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर १५० हून अधिक विकेट्स घेणारा कुलदीप यादव हा भारताचा तिसरा डावखुरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, रवींद्र जडेजा आणि झहीर खान यांनी हा पराक्रम करून दाखवला आहे. जाडेजाने आतापर्यंत घरच्या मैदानावर ३७७ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतले आहेत. तर, झहीर खान यांनी त्यांच्या कारकिर्दीत मायदेशात एकूण १९९ विकेट्स घेतले आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी महत्त्वाचा सामना
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या आवृत्तीसाठी टीम इंडियासाठी ही दोन सामन्यांची कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. जर भारतीय संघाने हे दोन्ही सामने जिंकले, तर ते डब्लूटीसीच्या पॉइंट टेबलमध्ये थेट दुसऱ्या स्थानावर जातील, ज्यामुळे या सामन्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.