Join us

IND vs SA 1st Test: भारताने 'सेंच्युरियन'वर रचला इतिहास! आफ्रिकेला ११३ धावांनी चारली धूळ

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी ३-३ बळी टिपत आफ्रिकेला दुसऱ्या डावातही फारशी चांगली कामगिरी करू दिली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 16:51 IST

Open in App

भारतीय संघाने आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने सेंच्युरियनच्या मैदानावर इतिहास रचला. सेंच्युरियनच्या मैदानावर आफ्रिकेला कसोटी सामन्यात पराभूत करणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला. ३०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारताने १९१ धावांतच गुंडाळलं आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली.

भारतीय संघाने पहिल्या डावात १३० धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावाअंती भारताने दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकन फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात आफ्रिकेने मार्करम (१), पीटरसन (१७), डुसेन (११) आणि महाराज (८) हे चार गडी गमावले. पाचव्या दिवशी सुरुवातीच्या अर्ध्या तासात त्यांनी संयमी खेळ केला. पण नंतर एकाकी झुंज देणारा कर्णधार डीन एल्गर ७७ धावांवर बाद झाला. अनुभवी क्विंटन डी कॉक २१ धावांवर स्वत:च्या चुकीने त्रिफळाचीत झाला. त्यानंतर मुल्डर (१), जेन्सन (१३), रबाडा (०) आणि एन्गीडी (०) यांना स्वस्तात बाद करत भारताने सामना जिंकला. टेंबा बावुमा मात्र शेवटपर्यंत झुंज देत ३५ धावांवर नाबाद राहिला.

लोकेश राहुल ठरला सामनावीर

भारताचा सलामीवीर केएल राहुल याने पहिल्या डावात केलेल्या दमदार शतकी खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. राहुलने पहिल्या डावात २००हून जास्त चेंडूंचा सामना करत १२३ धावांची खेळी केली. त्यात १७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामन्यात वैयक्तिक स्तरावर सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर होण्याचा विक्रम त्याने रचला. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात त्रिशतकी मजल मारली.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकालोकेश राहुलजसप्रित बुमराहमोहम्मद शामी
Open in App