Join us

India vs South Africa 1st Test: विराट काही सुधरेना, पुन्हा केली तीच चूक अन् गमावली विकेट, पाहा Video

भारताचा कर्णधार विराट कोहली दोन्ही डावात चांगली सुरूवात मिळाल्यानंतर सारखीच चूक करत बाद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 16:51 IST

Open in App

IND vs SA 1st Test Day 4: भारताला पहिल्या डावात १३० धावांची आघाडी मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजांची कामगिरी थोडीशी बिघडली. मयंक अग्रवाल आणि लोकेश राहुल दोघांपैकी कोणीही पन्नाशी गाठू शकला नाहीत. शार्दूल ठाकूरला नाईट वॉचमन म्हणून पाठवण्यात आले होते, पण तोदेखील फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार विराट कोहलीवर साऱ्यांच्या नजरा होत्या. कोहलीने चांगली सुरूवात केली पण पुन्हा एकदा पहिल्या डावासारखीच चूक करत तो बाद झाला.

विराट कोहलीने चौथ्या दिवशीचे पहिले सत्र संपेपर्यंत संयमी खेळी केली. १८ धावांवर तो लंच टाईमसाठी गेला. पण दुसऱ्या सत्रासाठी परतल्यावर लगेचच त्याने आपली विकेट बहाल केली. डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सन याने विराटला ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू टाकला. तो चेंडू टोलवण्याच्या प्रयत्नात तो यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बसला. पहिल्या डावातही त्याने ३५ धावांची चांगली सुरूवात मिळाल्यानंतर ऑफ स्टंपबाहेरील चेंडू बॅट लावल्याने तो बाद झाला होता. पण त्या चुकीतून धडा न घेता दुसऱ्या डावातही त्याने तीच चूक केली आणि त्याला तंबूत परतावे लागले.

त्याआधी, विराट फलंदाजी करत असताना लुंगी एन्गीडीच्या गोलंदाजीवरच तो पायचीत असल्याचे अपील करण्यात आले होते. त्याला पंचांनी नाबाद ठरवल्यावर आफ्रिकेने डीआरएसचा वापर केला. त्यात चेंडू बेल्सला वरच्या बाजूला लागत असल्याने पंचांचाच निर्णय अंतिम (Umpire's Call) ठेवण्यात आला. त्यावेळी जर पंचांनी बाद दिल्यावर विराटने डीआरएसचा वापर केला असता तर रिव्ह्यू बचावला असता पण विराटला मात्र माघारी परतावे लागले असते. विराटला एकदा नशिबाची साथ मिळाल्यावर तो संधीचं सोनं करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण विराटने मात्र दोन्ही डावात तीच चूक करत विकेट बहाल केली.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीलोकेश राहुलअजिंक्य रहाणे
Open in App