पार्ल : ‘खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला साथ देत असल्याचे पाहून मी स्विप फटके खेळण्याचे ठरवले. यावेळी मी रिव्हर्स स्विपही खेळण्याचा प्रयत्न केला. या जोरावरच मी भारतीय फिरकी गोलंदाजांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला,’ अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या सामन्यातील शतकवीर आणि सामनावीर रासी वॅन डेर डुसेन याने दिली. डुसेनने नाबाद १२९ धावांची खेळी करताना कर्णधार तेम्बा बवुमासोबत चौथ्या गड्यासाठी २०४ धावांची विक्रमी भागीदारी केली. ही भागीदारीच सामन्यात निर्णायक ठरली. सामन्यानंतर डुसेन म्हणाला की, पार्ल येथील खेळपट्टी अनेकदा संथ असते.
त्यामुळे फिरकी गोलंदाजांचा यशस्वी सामना करण्यासाठी मी स्विप फटक्यांचा आधार घेतला. कसोटी मालिकेत दडपणाखाली असताना आम्ही दोन विजय मिळवले. यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. एकूणच फलंदाजांसाठी चांगला दिवस ठरला.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना वेगवान गोलंदाजांवर वर्चस्व मिळवण्यासाठी ओळखले जाते. मात्र फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी आम्ही कठोर मेहनत घेतली असून, या मेहनतीचा मोठा फायदा झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. - रासी वॅन डेर डुसेन