ind vs pak wc 2023 venue : ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आगामी विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अहमदाबाद येथे होणाऱ्या या बहुचर्चित सामन्यासाठी येथील हॉटेल्सच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांनी एक नवीन युक्ती शोधून काढली आहे. कारण लोकांनी चक्क हॉस्पिटलमध्ये बेड बुक करणे सुरू केले आहे, ज्याचे भाडे हॉटेलच्या किमतीपेक्षा कमी आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १५ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. अशा स्थितीत हॉटेल्समध्येच नव्हे तर हॉस्पिटलमध्ये देखील रूमची बुकिंग सुरू झाली आहे. आयसीसीने या सामन्याची तारीख जाहीर केल्यापासून येथे हॉटेल बुकिंग सुरू झाले. संधीचा फायदा बघून हॉटेल चालकांनी देखील दर वाढवले. अहमदाबादमध्ये सध्या सामन्याच्या तारखेसाठी किंवा आसपासच्या दिवसाचे बुकिंग सुमारे ५० हजार रुपये एवढे आहे.
IND vs PAK सामन्याची उत्सुकता शिगेला
insidesportने दिलेल्या वृत्तानुसार, आता लोकांनी रूग्णालयात बेड बुक करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी रुग्णालय चालकांनी एक रात्र किंवा दिवसाचे पॅकेजही तयार केले आहे. हॉटेल्समध्ये सुमारे ५० हजार रुपये खर्च करण्याऐवजी आता हॉस्पिटलमध्ये ३ हजार ते २५ हजार रुपयांना बेड बुक केले जात आहेत. स्टेडियमच्या आजूबाजूला बांधलेल्या हॉस्पिटलमध्ये चाहत्यांनी रूम बुक करण्यास सुरुवात केली आहे.
१५ ऑक्टोबरला थरार
आगामी वन डे विश्वचषक भारतात होणार असून स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ५ ऑक्टोबरपासून या बहुचर्चित स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, तर १५ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील. सलामीचा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे.
विश्वचषकातील भारताचे सामने -
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू