Sunil Gavaskar Pakistan Popatwadi Team Ind vs Pak Asia Cup 2025 : टीम इंडियाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला अतिशय सहज विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी आणि सामना संपल्यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन केले नाही. या मुद्द्यावरून अनेक आजी-माजी खेळाडूंनी आपली रोखठोक मते मांडली. पण याचदरम्यान, भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर बोट ठेवले आणि त्यांच्या संघाला पोपटवाडी संघ म्हणजे एखादा स्थानिक संघ असल्याचे म्हणाले.
भारत-पाकिस्तान सामना संपल्यानंतर सुनील गावसकर कॉमेंट्री पॅनेलशी मैदानावरून संवाद साधत होते. त्यावेळी त्यांना सामन्याबद्दल आणि पाकिस्तानी संघाच्या कामगिरी बद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी पाकिस्तानी संघाचा उल्लेख 'पोपटवाडी' टीम असा केला. "मी माझ्या उमेदीच्या काळात १९६० पासून पाकिस्तानचा संघ पाहत आलो आहे. मी चर्चगेट स्टेशनपासून धावत ब्रेबॉर्न स्टेडियमपर्यंत धावत केवळ हानिफ मोहम्मद यांचा खेळ बघायला जायचो. तेव्हापासूनचा पाकिस्तानचा संघ मला आठवतो. तेव्हापासून आतापर्यंत बोलायचे झाले तर यावेळचा पाकिस्तानचा संघ हा 'पोपटवाडी' टीम असल्यासारखे वाटले," अशा शब्दांत गावसकरांनी त्यांनी खिल्ली उडवली.
दरम्यान, पाकिस्तानच्या संघाची कामगिरी खूपच सुमार होती. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने केवळ १२७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १६व्या षटकात ७ गडी राखून सामना जिंकला.
सामनाधिकाऱ्यांना काढून टाका !
पाक क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार, पाकिस्तानी कर्णधार भारतीय ड्रेसिंग रुमपर्यंत आला पण भारतीय खेळाडूंनी दरवाजा लावून घेतला. घडलेल्या प्रकारावरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय कर्णधाराच्या या वर्तणुकीबाबत अधिकृतरित्या निषेधही नोंदवला आहे. त्यासोबतच, आता दुखावलेल्या पाकिस्तानला वाटते की या प्रकरणात खरी चूक मॅच रेफरींची आहे. आणि म्हणूनच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे त्यांना काढून टाकण्याची मागणी केली आहे.