Shahid Afridi Irfan Pathan IND vs PAK Asia Cup 2025: आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांचे क्रिकेटतज्ज्ञ आपापली मते मांडताना दिसत आहेत. परंतु पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने जे म्हटले आहे ते खूपच वादग्रस्त आणि भारतीयांना चिथावणारे आहे. शाहिद आफ्रिदी नेहमीच भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. अशा परिस्थितीत, त्याने आता इरफान पठाणवर निशाणा साधत वादग्रस्त विधाने केली आहेत.
काय म्हणाला आफ्रिदी?
आफ्रिदीने पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवरील आशिया कप शो दरम्यान वादग्रस्त विधान केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आफ्रिदी असे म्हणताना ऐकू येतो, "भारताच्या मुस्लिम खेळाडूंना त्यांची घरे जाळून टाकण्याची धमकी दिली जाते. तेथे असेही काही क्रिकेटपटू आहेत, जे अजूनही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत की ते भारतीयच आहेत. आणि आता तर तेच लोक आशिया कपमध्ये जाऊ कॉमेंट्रीही करत आहेत."
इरफान पठाणला केलं लक्ष्य
शाहिद आफ्रिदीने या टीव्ही शोमध्ये बोलताना भारतीय दिग्गज इरफान पठाणला नाव न घेता लक्ष्य केले आहे. व्हायरल क्लिपमध्ये त्याने ज्या खेळाडूबद्दल भाष्य केले आहे, तो इरफान पठाण आहे. कारण इरफान पठाणचा हा सोनी नेटवर्कच्या समालोचन पॅनेलमध्ये समावेश आहे. तथापि, शाहिद आफ्रिदीच्या या वादग्रस्त व्हिडिओवर इरफान पठाणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आफ्रिदीवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.
WCLचा राग आफ्रिदीच्या मनात
अलीकडेच, इंडिया चॅम्पियनच्या खेळाडूंनी वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानसोबतच्या सामन्यावर बहिष्कार टाकला. इंडिया चॅम्पियनमधील इरफान पठाण, शिखर धवन, हरभजन सिंग आणि युवराज सिंगसारख्या खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला होता. भारतीय खेळाडूंच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर पाकिस्तानचा अपमान झाला आणि भारतीय चाहत्यांनी या गोष्टीचे कौतुक केले होते. त्यामुळे आफ्रिदी अजूनही संतापलेला दिसतो.