IND vs PAK, Women's ODI World Cup 2025: पाकिस्तानचं संडे रूटीन... मैदानात या.. खेळा.. भारताशी हरा.. घरी जा.. असं जर आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण पाकिस्तानचा संघ गेल्या चार आठवड्यापासून हेच करताना दिसतोय. आधी आशिया कप आणि आता महिला वनडे वर्ल्डकप, स्पर्धा बदलली तरीही पाकिस्तानचं नशीब बदलताना दिसत नाहीये.
भारत सातत्याने पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानावर पराभूत करत आहे. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला ८८ धावांनी पराभूत केले. रविवारी ५ ऑक्टोबरला कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या हा सामना झाला. भारताने पाकिस्तानसमोर २४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य पाकिस्तानसाठी फारच आव्हानात्मक ठरले. संपूर्ण पाकिस्तानी संघ ४३ षटकांत केवळ १५९ धावांवर तंबूत परतला. आणि भारतीय संघाने सलग चौथ्या रविवारी पाकिस्तानवर विजय मिळवला.
चार सामने, चार पराभव
भारताने पाकिस्तानी संघाविरुद्ध सलग चार रविवार जिंकले. प्रत्येक रविवार हा पाकिस्तान क्रिकेट संघासाठी 'नकोसा' ठरला. १४ सप्टेंबर, २१ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर या तीन रविवारी पुरुषांच्या आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. आधी गट सामना, मग सुपर-४ आणि अखेर अंतिम सामन्यात भारतीय पुरूष संघाने पाकिस्तानला पराभूत केले. त्यानंतर ५ ऑक्टोबरच्या रविवारी भारतीय संघाने महिला क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव केला. स्पर्धा बदलली, महिना बदलला पण पाकिस्तानचा संघ अजूनही भारताविरूद्ध विजयी लय शोधू शकलेला नाही.
सलग १२वा विजय
भारतीय संघाची पाकिस्तानविरूद्धची कामगिरी सध्यातरी अबाधित आहे. महिला क्रिकेट विश्वचषकात भारताच्या मुलींनी पाकिस्तानला धडा शिकवला. महत्त्वाचे म्हणजे, महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा पाकिस्तानवर हा सलग १२वा विजय होता. भारताने पाकिस्तानविरुद्ध एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही, ज्यामुळे आता भारताचा स्कोअर १२-० असा झाला आहे.