Pakistan Jay Shah IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानचा संघ पहिला सामना सहज जिंकला, पण दुसऱ्या सामन्यात भारताविरूद्ध खूप वाईट हरला. तशातच आता तो त्यांच्या एका निर्णयामुळे अडकला आहे. भारताविरुद्ध हस्तांदोलन वादानंतर पाकिस्तानने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टविरुद्ध तक्रार केली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आरोप केला की पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही संघांना हस्तांदोलन करण्यापासून रोखले होते, तरीही आयसीसीने मॅच रेफरीला क्लीन चिट दिली. पाकिस्तानी माध्यमांमधून असे वृत्त आले होते की जर मॅच रेफरीवर कारवाई केली गेली नाही तर पाकिस्तान आशिया कपमधून माघार घेऊ शकतो. परंतु ताज्या अहवालानुसार, पाक क्रिकेट बोर्ड असे पाऊल चुकूनही उचलणार नाही आणि याचे कारण जय शाह असे सांगितले जात आहे.
पाकिस्तानला जय शाहांची दहशत भीती
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आशिया कपमधून आपला संघ मागे घेणार नाही. पीसीबीच्या सूत्रांनी माहिती दिली आहे की जर पाकिस्तानने आशिया कपमधून माघार घेतली, तर जय शाह यांच्या नेतृत्वाखालील आयसीसी त्यांच्यावर मोठा दंड आकारू शकते. हा आर्थिक दंड खूप जास्त असू शकतो, जो पीसीबीला झेपणार नाही. पीसीबीच्या सूत्रांनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पाकिस्तानमधील सर्व स्टेडियमच्या दुरुस्तीसाठी खूप पैसा खर्च झाला आहे, ज्यामुळे पीसीबीची आर्थिक स्थिती चांगली नाही. अशात रागाच्या भरात पाक बोर्डाने माघारीचा निर्णय घेतला तर त्याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसू शकतो.
पाकिस्तान स्पर्धेत पुढे जाणार की नाही?
पाकिस्तानचा संघ आशिया कपमध्ये आपला पुढचा सामना १७ सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध खेळणार आहे. पाकिस्तानसाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे. कारण जर यूएईने हा सामना जिंकला, तर पाकिस्तान सुपर-४ फेरीत पोहोचण्यापासून वंचित राहू शकतो. जर पाकिस्तानने यूएईला हरवले तर येत्या रविवारी म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येतील. भारत आणि पाकिस्तान मंगळवारी आयसीसी अकादमीमध्ये सराव करणार आहेत, जरी दोघांचा सराव वेळ वेगळा असला तरी दोन्ही संघ एक तास एकत्र दिसतील. भारताचा सराव संध्याकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत आहे, तर पाकिस्तानचा संघ रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत सराव करणार आहे.