दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत. क्रिकेट जगताची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने या सामन्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. कोणताही एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू शकतो, असे सांगत अक्रमने दोन्ही संघांना विजयासाठी योग्य मंत्र दिला आहे.
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
अक्रम म्हणाला की, "दोन्ही संघांमध्ये विजेतेपदाची क्षमता आहे." मात्र, त्याने पाकिस्तान संघाला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. त्याने म्हटले की, पाकिस्तानने आपला आत्मविश्वास कायम ठेवावा आणि पूर्ण तयारीने खेळावे. भारतीय संघातील युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे पाकिस्तानसाठी धोक्याचे ठरू शकतात, असे अक्रमने सांगितले. "जर पाकिस्तानला सामना जिंकायचा असेल, तर त्यांना अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांना लवकर बाद करावे लागेल," असे त्याने स्पष्ट केले.
हा अंतिम सामना ऐतिहासिक आहे, कारण आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. यापूर्वी २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये हे दोन संघ आमने-सामने आले होते, ज्यात भारताने थरारक विजय मिळवला होता. वसीम अक्रमने हा सामना अटीतटीचा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली असून, अखेरीस सर्वोत्तम संघ जिंकेल अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच मला आशा आहे की रविवारी पाकिस्तानची गोलंदाजी प्रभावी असेल. भारत हा सामना जिंकण्यासाठी निश्चितच प्रबळ संघ आहे, असे तो म्हणाला.