IND vs PAK Biggest Controversy : क्रिकेटला 'जेंटलमन गेम' (Gentleman’s Game) मानलं जातं. क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या दोन्ही संघांतील खेळाडूंकडून या खेळात नैतिकता आणि प्रामाणिकपणासह खेळाडूवृत्ती जपण्याची अपेक्षा ठेवली जाते. पण बऱ्याचदा एखादा संघ किंवा संघातील खेळाडूच्या मैदानातील असभ्य कृतीमुळं या खेळावर बदनामीचा ठपका लागल्याचेही अनेक किस्से घडले आहेत. चौहूबाजूंनी कॅमेरे असताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेले 'उंदीर चाळे' अर्थात चेंडू कुरतडण्याचा प्रकार असो वा मॅच फिक्सिंगसारखी काही गाजलेली प्रकरणे यामुळे क्रिकेटमध्ये मोठा भूंकप झाल्याचे पाहायला मिळाले आहे. क्रिकेटच्या मॉडर्न जमान्यात तर आक्रमक शैलीत खेळ करण्याच्या नावाने 'स्लेजिंग'चा डाव ही एक फॅशनच झालीये. याची क्रेझ चाहत्यांमध्येही लोकप्रिय झाल्याचे दिसून येते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत-पाक लढत झाली अन् हस्तांदोलना संदर्भातील प्रकरण गाजले
आता क्रिकेटच्या मैदानात भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे जणू युद्धच. आशिया कप स्पर्धेत पुन्हा हे दोन संघ समोरासमोर आले अन् हँडशेकचा मुद्दा गाजला. पाकविरुद्ध खेळण्याला झालेला विरोध लक्षात घेऊन टीम इंडियातील खेळाडूंनी 'कनेक्टिंग इंडिया... ओन्ली फॉर क्रिकेट' या पॅटर्नसह मैदानात उतरत पाक विरुद्ध 'सोशल डिस्टन्सिंग'चा नियम पाळला. खरंतर ही कृती असभ्य अजिबात नव्हती. पण पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडू अन् बोर्डाने उगाच हे प्रकरण तापवलं अन् स्वत:ची फजिती करून घेतली. टीम इंडियाच्या टी-२०- संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं पाकिस्तान संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळल्याचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सुपर फोरमध्ये पुन्हा एकमेकांना भिडताना काय चित्र दिसणार तेही पाहण्याजोगे असेल. पण तुम्हाला माहितीये का? भारत-पाक यांच्यातील लढतीत यापेक्षा मोठा वाद झाला आहे.
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
पाक विरुद्धच्या Live मॅचमध्ये भारतीय कर्णधारानं असा काढला होता राग भारतीय संघाच्या माजी कर्णधारानं पाकिस्तान विरुद्धच्या निर्णायक सामन्यात Live मॅच सुरु असताना बॅटिंग करत असलेल्या फलंदाजांना मैदानाबाहेर बोलवत मॅचवर बहिष्कार टाकला होता. या निर्णयामुळे पाकिस्तानने त्या मॅचसह मालिका जिंकली, पण हा सगळा प्रकार घडल्यावरही एकदम कूल अंदाजात टीम इंडियाच्या तत्कालीन कर्णधाराने पाक संघातील सर्व खेळाडूंना हस्तांदोलन करत क्रिकेट जगतात एक खास संदेश दिला. भारतीय संघाने ही मालिका गमावली. पण कर्णधाराने दाखवलेल्या बाण्याची इतिहासात नोंद झाली. नेमकं कधी अन् कुणाच्या नेृत्वाखालील भारतीय संघाने पाक विरुद्ध अर्ध्यावर सोडली होती मॅच? काय होतं त्यामागचं नेमकं कारण? जाणून घेऊयात सविस्तर
कोण आहे भारतीय संघाचा तो कर्णधार ज्यानं मॅचसह मालिकेचा विचार न करता घेतलेला मोठा निर्णय
ही गोष्ट आहे १९७८ सालची. माजी दिग्गज अन् दिवंगत क्रिकेटर बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १७ वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दोन सामन्यानंतर ही मालिका १-१ अशी बरोबरीत पोहचली होती. भारत-पाक यांच्यातील वनडे मालिकेतील निर्णायक सामना पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील साहीवालच्या झफर अली स्टेडियमवर रंगला होता. प्रत्येकी ४०-४० षटकांच्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने ७ विकेट्सच्या मोबदल्यात २०५ धावा केलेल्या. या धावांचा पाठलाग करताना ८ विकेट्स हातात असताना भारतीय संघाला १४ चेंडूत २३ धावांची गरज होती. अंशुमन गायकवाड ११५ चेंडूत ७८ धावांवर तर दुसऱ्या बाजूला गुंडप्पा विश्वनाथ १३ चेंडूत ८ धावांवर खेळत होते. आता ही जोडी म्हणजे भारतीय संघाच्या विजयाची गॅरेंटीच. पण त्यानंतर मैदानात एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. पाकिस्तानने चिटिंग केली अन् भारतीय संघाचे तत्कालीन कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी रडीचा डाव खेळणाऱ्यांविरुद्ध खेळण्यात अर्थ नाही म्हणत दोन्ही फलंदाजांना मैदानाबाहेर बोलवत मॅचसह मालिका पाकिस्तानला देऊन टाकली.
नेमकं काय घडलं होतं?
सामना रंगतदार अवस्थेत असताना पाकिस्तानकडून गोलंदाजीला आलेल्या सरफराज नवाझ याने बॅक टू बॅक चार बाउन्सर मारले. सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा यासाठी त्याने हे शस्त्र आजमावले. दुसरीकडे मैदानातील पंच जावेद अख्तर आणि खिझर हयात यांचीही त्यांना साथ मिळाली. जे चेंडू वाइड घोषित करायला हवे ते वैध ठरवण्यात आले. भारतीय संघाच्या कर्णधाराला ही गोष्ट खटकली अन् त्याची सटकली. मैदानातील पाकिस्तानी पंचाचा कारभार हा क्रिकेटचा अपमान आहे, असे म्हणत भारतीय संघाच्या माजी कर्णधारानं रडव्या पाकिस्तानसमोर मॅचसह मालिकेचा त्याग केला होता.