BCCI on No Handshake Controversy IND vs PAK Asia Cup 2025 : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरूद्ध सहज विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी आणि सामना संपल्यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनेपाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन केले नाही. अहवालानुसार, पाकिस्तानी कर्णधार भारतीय ड्रेसिंग रुमपर्यंत आला पण भारतीय खेळाडूंनी दरवाजा लावून घेतला. घडलेल्या प्रकारावरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय कर्णधाराच्या या वर्तणुकीबाबत अधिकृतरित्या तक्रार करत निषेध नोंदवला आहे. याचदरम्यान आता BCCI ने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
"जर तुम्ही नियमावली पाहिलीत तर त्यात असा कुठलाही विशिष्ट नियम नाही, ज्या अंतर्गत तुम्हाला प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हस्तांदोलन करावे लागेल. सामन्यानंतरचे हस्तांदोलन हा केवळ एक शिष्टाचार आहे. यासंबंधी कुठलाही कायदा करण्यात आलेला नाही. हा शिष्टाचार जगभरात खेळाच्या मैदानावर पाळला जातो. पण असे केलेच पाहिजे असा कुठलाही कायदा किंवा नियम नाही," असे एका वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना स्पष्ट केले.
"जर हस्तांदोलनबाबत असा कुठलाही कायदा किंवा नियम नसेल तर मग भारतीय संघ सामन्यानंतर पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करण्यास कुठल्याही अर्थाने बांधील नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय परिस्थिती तणावपूर्ण आहेत, अशा परिस्थितीत आमच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केले नाही यात काहीही चुकीचे नाही," अशी खमकी भूमिका बीसीसीआयने मांडली.
Web Title: IND vs PAK BCCI Breaks Silence On India vs Pakistan No Handshake Row in Asia Cup 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.