संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने सामने येणार आहे. मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्ध होत असलेल्या या क्रिकेट सामन्याला देशभरातून तीव्र विरोध होत आहे. काही राजकीय पक्षांनी या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करत आंदोलन सुरू केलं आहे. तर सोशल मीडियावरूनही या सामन्याविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, बहिष्कार आणि विरोधाचे हे वारे भारतामधून संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचले आहेत. तसेच भारतात घडत असलेल्या घडामोडींमुळे भारतीय संघ दबावात आल्याची चर्चा आहे. तसेच याबाबत भारतीय खेळाडू, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सपोर्ट स्टाफमध्ये चर्चा झाली आहे.
बहिष्कार आणि विरोधाच्या मोहिमेमुळे भारतीय क्रिकेटपटू चिंतीत असल्याने त्यांना व्यावसायिक दृष्टीकोन ठेवण्याचा आणि या सामन्याकडेही इतर सामन्यांप्रमाणेच पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र युवा खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ आज निर्माण झालेलं विरोधातील वातावरणाचा दबाव झेलू शकतो का? याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. सोशल मीडिया आणि मोबाईलमुळे भारतातील वातावरण आणि बीसीसीआयवर बहिष्कार घालण्याचं आवाहन त्यांच्यापर्यंतही पोहोचत आहे.
त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू काहीसे घाबरले असून, काय करावं हे त्यांना सूचत नाही आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिकच बिघडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ हा आशिया चषक स्पर्धेत खेळणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र भारत सरकारने परवानगी दिल्यानंतर बीसीसीआयने आपल्या संघाला दुबई येथे खेळण्यासाठी पाठवलं होतं. मात्र या निर्णयाविरोधात सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे.
दरम्यान, भारतीय संघावर सध्या एवढा दबाव आहे की, सामन्याच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेला मुख्य प्रशिक्षक, कर्णधार आणि कुठलाही प्रमुख खेळाडू उपस्थित राहिला नाही. सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचे मुख्य सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेन डोएशेट यांना पत्रकार परिषदेला पाठवले होते.
त्यांना याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, हा खूप संवेदनशील विषय आहे. भारतीय क्रिकेटपटू हे देशातील बहुतांश जनतेच्या भावना आणि सहानुभूतीचं प्रतिनिधित्व करत असतात. आशिया चषक स्पर्धा बऱ्याच काळापासून अधांतरी होती. तसेच आम्ही वाट पाहत होतो. एकवेळ आम्ही या स्पर्धेसाठी येणार नाही, असे आम्हाला वाटले होते, असेही त्यांनी सांगितले.