Mohsin Naqvi Team India IND vs PAK Asia Cup 2025: आशिया कप २०२५च्या अंतिम सामन्यात भारताचा रोमांचक विजय झाला. पण चॅम्पियनशिप सेलिब्रेशनऐवजी ट्रॉफीबाबतच्या गोंधळामुळे हा विजय जास्त चर्चेत राहिला. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तानी मंत्री मोहसिन नक्वी यांनी प्रोटोकॉल तोडला आणि भारताला ट्रॉफी आणि विजेत्याचे पदके स्वीकारण्यापासून रोखले. रविवारी रात्री दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाच्या पाच विकेट्सने विजयानंतर, ट्रॉफी समारंभ वादात सापडला. भारताच्या विजयानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यावर नक्वी यांनी प्रतिक्रिया देत गरळ ओकली.
मोहसीन नक्वी पाकिस्तानचे प्रतिनिधी असल्याचे कारण देत भारताने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. एसीसी अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांना पुरस्कार सादर करण्याचा सल्ला दिला, परंतु नक्वी यांनी तो प्रस्ताव नाकारला. त्यामुळे स्टँडमधील प्रेक्षक संतप्त झाले आणि त्यांनी "भारत माता की जय" असा जयघोष केला. पाकिस्तानी संघ बराच वेळ ड्रेसिंग रूममध्ये राहिला, ज्यामुळे नक्वी अस्वस्थ झाले. जवळजवळ एक तासाच्या वादानंतर, स्टेजवरून ट्रॉफी काढून नेण्यात आली. फक्त तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांचा स्वतंत्रपणे सन्मान करण्यात आला.
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले. या ट्विटला उत्तर देताना नक्वी यांनी गरळ ओकली. "जर युद्ध हे तुमच्या अभिमानाचे मापक असेल, तर इतिहासाने पाकिस्तानविरुद्ध तुमचा अपमानजनक पराभव आधीच नोंदवला आहे. कोणताही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही. खेळात युद्ध आणणे हे केवळ निराशा दर्शवते आणि खेळाचा अपमान करते," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
![]()
दरम्यान, भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर लिहिले होते, "मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकाल सारखाच आहे - भारत जिंकला! आमच्या क्रिकेट संघाचे अभिनंदन." मोहसिन नक्वी यांनी X वर यावर प्रतिक्रिया दिली.