Harbhajan Singh on IND vs PAK Asia Cup 2025: भारतीय संघ ९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेत भारताला पाकिस्तानशी देखील सामना खेळावा लागणार आहे. १४ सप्टेंबरला हा सामना खेळला जाणार आहे. पण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानशी असलेले सर्व प्रकारचे संबंध तोडले. चर्चा आणि दहशतवाद एकाच वेळी होऊ शकत नाही, असे भारताने पाकला ठणकावून सांगितले. असे असताना, भारतीय संघाने पाकिस्तानशी आशिया चषक स्पर्धेतही खेळू नये असा सूर दिसून येत आहे. पण भारत सरकारच्या परवानगीने BCCI भारत-पाक सामना खेळणार आहे. यावर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हरभजन सिंग प्रचंड संतापला आहे.
हरभजन सिंग अलीकडेच पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) चा भाग होता, जिथे इंडिया चॅम्पियन्स संघाने ग्रुप स्टेज आणि सेमीफायनल दोन्हीमध्ये पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. हरभजन आशिया कपबाबत म्हणतो, "भारताने आगामी आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानशी सामना खेळू नये. आपल्यासाठी प्रथम देश आणि नंतर खेळ असला पाहिजे. सीमेवर तैनात असलेले सैनिक देशासाठी बलिदान देतात. मग मीडिया पाकिस्तानला इतके महत्त्व का देते? रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग आपण त्यांना इतके महत्त्व का देतो? भारताने आशिया कपवर बहिष्कार टाकावा."
"भारतासाठी काय महत्त्वाचे आहे आणि काय नाही हे समजून घेतले पाहिजे. माझ्यासाठी आपल्या देशाचा सीमेवर उभा असलेला सैनिक, त्याचे कुटुंब हे महत्त्वाचे आहेत. आपले अनेक जवान शहीद होतात, ते घरी परतूही शकत नाहीत. त्यांचे बलिदान आपल्या सर्वांसाठी असते. अशा परिस्थितीत, आपण साध्या एका क्रिकेट सामन्याला नकार देऊ शकत नाही, हे अयोग्य आहे," असे हरभजन म्हणाला.
"एकीकडे सीमेवर लढाई सुरु असताना, दुसरीकडे आम्ही त्यांच्याशी क्रिकेट खेळतो हे वाईट आहे. जोपर्यंत मोठे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत क्रिकेट ही एक अतिशय लहान गोष्ट आहे, देश नेहमीच प्रथम येतो. देशापेक्षा कोणीही मोठे नाही आणि त्याप्रती आपले कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे आहे," असे तो म्हणाला.