Join us

भारत-न्यूझीलंड फायनलचा सामना टाय झाल्यास ट्रॉफी कुणाची? जाणून घ्या नियम

IND vs NZ, Champions Trophy 2025 Final Scenarios: भारत-न्यूझीलंड यांच्यात उद्या रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 13:59 IST

Open in App

IND vs NZ, Champions Trophy 2025 Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात Champions Trophy 2025 ची फायनल उद्या, ९ मार्चला रंगणार आहे. दुबईच्या स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाने CT 2025 मध्ये आतापर्यंत एकही सामना हरलेला नाही. आधी बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया अशा चार संघांना पराभूत करून भारताने फायनल गाठली आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तान, बांगलादेश यांना साखळी फेरीत तर आफ्रिकेला सेमीफायनलमध्ये हरवून फायनल गाठली. न्यूझीलंडने CT 2025 मध्ये केवळ एक सामना गमावला असून, तो सामना भारताविरूद्धचा होता. आता पुन्हा एकदा भारत आणि न्यूझीलंडचा संघ दुबईच्या मैदानावर विजेतेपदाच्या लढतीसाठी आमनेसामने येणार आहेत. हा सामना जर ड्रॉ झाला किंवा बरोबरीत सुटला तर ट्रॉफी कुणाला मिळणार, ते जाणून घेऊया.

भारत आणि न्यूझीलंड सामना ड्रॉ झाल्यास विजेता कोण?

भारत आणि न्यूझीलंड या दोन तुल्यबळ संघात 'काँटे की टक्कर' रंगणार आहे. आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांनी स्पर्धेत खेळलेल्या सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. दोन्ही संघांकडून प्रभावी खेळी करण्यात आल्या आहेत. अशात जर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा न्यूझीलंडशी होणारा फायनलचा सामना टाय किंवा ड्रॉ झाला तर निकाल लावण्यासाठी सामन्यात सुपर-ओव्हर खेळवण्यात येईल. सहसा वनडे सामन्यात सुपर-ओव्हरचा पर्याय नसतो, पण २०१९ वनडे वर्ल्डकप फायनलमधील गोंधळानंतर सुपर-ओव्हरबाबतचा पर्याय अधिक प्रभावीपणे वापरण्यास सुरूवात झाली आहे. तसेच, पाऊस किंवा इतर कुठल्याही अनपेक्षित कारणाने सामना अर्ध्यातच थांबवावा लागला तर पुढला एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. त्या दिवशी उर्वरित सामना खेळवला जाईल. पण जर सामना पूर्ण होऊच शकला नाही तर अखेरीस विजेतेपद विभागून दिले जाईल. पण त्याची शक्यता खूपच कमी आहे.

दोन्ही संघांचा फायनल पर्यंतचा प्रवास

भारतीय संघाने सलामीच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. त्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. अखेरीस न्यूझीलंडला शेवटच्या साखळी सामन्यात पराभूत केले. त्यानंतर सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा काटा काढला. न्यूझीलंडच्या फायनलपर्यंतच्या प्रवासाबाबत बोलायचे झाल्यास, त्यांनी सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केले. त्यानंतर बांगलादेशी वाघांची शिकार केली. शेवटच्या साखळी सामन्यात त्यांनी भारताकडून पराभूत व्हावे लागले. तर सेमीफायनलमध्ये त्यांनी आफ्रिकेला हरवून अंतिम फेरी गाठली.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ