Join us

वरुण चक्रवर्तीचा पराक्रम; चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच मॅचमध्ये सेट केला खास विक्रम

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात केली हवा, अर्धा संघ तंबूत धाडत नावे केला खास रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 23:18 IST

Open in App

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीनं हवा केली. २५० धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत धाडत त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पदार्पणाच्या खास विक्रमाला गवसणी घातली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका सामन्यात पाच विकेट्स घेणारा भारताचा तो तिसरा गोलंदाज ठरलाय. याआधी रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या दोघांनी अशी कामगिरी करून दाखवली होती.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वरुण चक्रवर्तीनं या पाच फलंदाजांची केली शिकार

 न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीनं पाच विकेट्स घेत खास पराक्रमाला गवसणी घातली. दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात वरुण चक्रवर्तीनं १० षटकात ४२ धावा खर्च करताना पाच फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. यात सलमावीर विल यंग त्याची पहिली शिकार ठरला. त्याच्याशिवाय ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री यांची त्याने शिकार केल्याचे पाहायला मिळाले. 

मोहम्मद शमीनं यंदाच्या हंगामातच साधला होता डाव

मोहम्मद शमीनंही वरुण चक्रवर्तीप्रमाणे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यातच हा डाव साधला होता. यंदाच्या हंगामात शमी पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळत आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शमीनं १० षटकांच्या कोट्यात ५३ धावा खर्च करत ५ विकेट्स घेतल्या होत्या.  

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अशी कामगिरी करणारा जड्डू पहिला भारतीय  गोलंदाज 

रवींद्र जडेजा हा भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाच विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज आहे. त्याने २०१३ च्या हंगामात वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात 'पंजा' मारला होता. या सामन्यात जड्डूनं १० षटकांच्या कोट्यात फक्त ३६ धावा खर्च करताना अर्धा  कॅरेबियन संघ तंबूत धाडला होता. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघमोहम्मद शामीरवींद्र जडेजा