पहिल्या पाच ओव्हरच्या स्पेलमध्ये विल यंगच्या रुपात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपली पहिली विकेट घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीनं दुसऱ्या स्पेलमध्येही आपल्या फिरकीतील मॅचला टर्निंग पॉइंट देण्याची धमक दाखवून दिली. एका बाजूला केन विलियम्सन दुबईच्या मैदानात नांगर टाकून उभा असताना भारतीय फिरकीपटूंनी दुसऱ्या बाजूनं किवी फलंदाजीला खिंडार पाडलं. त्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिला सामना खेळणाऱ्या वरुण चक्रवर्ती आघाडीवर राहिल्याचे पाहायला मिळाले.
षटकार मारला, मग वरुण चक्रवर्तीनं पुढच्याच चेंडूवर वचपा काढला
न्यूझीलंडच्या डावातील ३६ व्या षटकात वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलिप्सनं उत्तुंग फटका मारत सामन्यात ट्विस्ट आणण्याचे झलक दाखवली. टप्प्यात घावलेला चेंडू ग्लेन फिलिप्सनं स्टँडमध्ये मारला. पण हा षटकार खाल्ल्यावर वरुण चक्रवर्तीनं लगेच त्याचा वचपा काढत ग्लेन फिलिप्सला पायचित करत तंबूत धाडले. एवढ्यावरच वरुण चक्रवर्ती थांबला नाही. त्यानंतरच्या षटकात त्याने मिचेल ब्रेसवेलच्या रुपात आणखी एक विकेट घेत न्यूझीलंडच्या ताफ्यात टेन्शन निर्माण केले.