Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! रोहित-विराटसह वरिष्ठांनी सरावास नकार दर्शवला; पराभवानंतर खळबळजनक खुलासा

ind vs nz test series : भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास विरोध दर्शवला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 23:34 IST

Open in App

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला चांगला सराव करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, कर्णधार रोहित शर्मासह काही वरिष्ठ खेळाडूंनी याकडे कानाडोळा केल्याने भारताला लाजिरवाण्या पराभवांचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने ३-० ने मालिका जिंकताच खळबळजनक खुलासा क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेपूर्वी भारतीय संघातील शिलेदारांना दुलीप ट्रॉफीद्वारे सराव करण्याची आयती संधी चालून आली होती. परंतु, देशांतर्गत क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्यापही बहुतांश खेळाडूंचा म्हणावा तसा चांगला नाही. शतकांचा बादशाह असलेल्या सचिन तेंडुलकरनेदेखील कारकि‍र्दीच्या अखेरीस देशांतर्गत क्रिकेट गाजवून नव्या चेहऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला; पण, आता सरावाचा अभाव भारताला पराभवाकडे घेऊन गेला. 

रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पाहुण्या न्यूझीलंडने तिसरा विजय साकारला अन् यजमानांची दिवाळी कडू झाली. क्रिकेट जाणकारांच्या म्हणण्यानुसार, केवळ सरावाच्या अभावामुळे टीम इंडियाला सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाने पुरेसा सराव केला नव्हता किंबहुना त्यांना अधिक काळ सराव करता आला असता. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी खेळाडूंना खूप विश्रांती मिळाली होती. सुनील गावस्करांनी सांगितले की, न्यूझीलंडकडे चांगल्या फलंदाजांची, गोलंदाजांची फौज आहे. ते आयपीएलमध्ये तसेच भारतीय खेळाडूंसोबत खेळले असल्याने त्यांना येथील खेळपट्टीचा चांगला अंदाज आहे. 

दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटकडे कानाडोळा करणाऱ्यांमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या बड्या नावांचाही समावेश आहे. मागील दहा डावात त्यांना एकही मोठी खेळी करता आलेली नाही. विराटने १९२ तर रोहितला अवघ्या १३३ धावा करता आल्या आहेत. या दोघांनी देशांतर्गत क्रिकेट खेळलेल्या बराच काळ लोटला आहे. रणजी करंडकमध्ये रोहित शेवटच्या वेळी २०१५ मध्ये दिसला होता, तर विराटने २०१२ पासून एकदाही देशांतर्गत क्रिकेटकडे पाहिले नाही. 

जूनमध्ये झालेल्या ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ नंतर मोठ्या कालावधीपर्यंत टीम इंडियातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. माहितीनुसार, निवड समितीच्या नियोजनानुसार, दुलीप ट्रॉफीसाठी सर्व आघाडीच्या खेळाडूंनी उपलब्ध राहायला हवे असे अपेक्षित होते. लाल चेंडूच्या या क्रिकेटमुळे भारताच्या वरिष्ठ संघातील शिलेदारांचा चांगला सराव व्हावा या हेतूने हे पाऊल टाकण्यात आले होते. पण, विराट कोहली, रोहित शर्मा यांसह काही आघाडीच्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यात रस दाखवला नाही. रवींद्र जडेजाने दुलीप ट्रॉफी खेळण्यास होकार दिला होता. मात्र, रोहित, विराट, अश्विन आणि बुमराहचा नकार ऐकून निवड समितीने जडेजाला इकडे न वळवता विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.

खरे तर शुबमन गिल, सर्फराज खान, रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत भाग घेतला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी झालेल्या या स्पर्धेमुळे काही प्रमाणात यांना फायदादेखील झाला. यापैकी बहुतांश जणांनी साजेशी खेळी करुन दाखवली. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळल्याचा फायदा यावरुन स्पष्ट होतो. 

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंडबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ